उत्तर भारतीय पंचांगानुसार, उत्तर भारतात 22 जुलैपासून श्रावण महिना सुरू झाला आहे. श्रावण महिना सुरू होताच उत्तर भारतात कावड यात्रेची लगबग सुरू होते. पवित्र नद्यांच्या पाण्याने शिवलिंगावर जलाभिषेक केला जातो. उत्तर भारतात कावड यात्रेसाठी सरकारने जय्यत तयारी केली आहे. कावड यात्रेच्या मार्गावर भाविकांसाठी खाद्यपदार्थांच्या दुकानांवर नावं लिहिण्यावरून जो नियम जारी केला गेला त्यावरून वाददेखील झाले. कावड यात्रा काळात वाहतुकीबाबत विशेष नियमावली जारी केली आहे. श्रावण महिन्यात मोठ्या संख्येने भाविक केशरी रंगाचे कपडे परिधान करून कावड यात्रा काढतात. यामागे काही कारणं आहेत.
advertisement
कावड यात्रेमागे काही पौराणिक कथा सांगितल्या जातात. त्यातल्या एका कथेनुसार, जेव्हा समुद्रमंथनातून बाहेर पडलेलं विष भगवान शंकराने प्राशन केलं तेव्हा त्यांच्या घशाचा दाह होऊ लागला. त्या वेळी भगवान शंकराचा परमभक्त असलेल्या रावणाने कावडीने पाणी आणून भगवान शंकरावर जलाभिषेक केला. त्यामुळे भगवान शंकराला होणारा दाह कमी झाला. तेव्हापासून भगवान शंकराची कृपादृष्टी प्राप्त करण्यासाठी कावड यात्रा काढली जाते.
दुसऱ्या एका कथेनुसार, भगवान परशुरामाने पहिल्यांदा कावड यात्रा काढली होती. भगवान शंकराचे भक्त असलेल्या परशुरामाने त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी गढमुक्तेश्वरवरून गंगाजल आणून शिवलिंगावर जलाभिषेक केला होता. तेव्हापासून कावड यात्रा सुरू झाल्याचं मानण्यात येतं.
यंदा श्रावण महिन्यातली कावड यात्रा 22 जुलैपासून सुरू झाली आहे. श्रावणात शिवभक्त कित्येक किलोमीटर प्रवास करून पवित्र नद्यांचं जल आणतात आणि त्याने शिवलिंगाला जलाभिषेक करतात. प्रामुख्याने गंगा नदीच्या पाण्याने शिवलिंगावर अभिषेक केला जातो. उत्तर भारतीय पंचांगानुसार, यंदा श्रावण शिवरात्र 2 ऑगस्ट रोजी आहे. उत्तर भारतात कावड यात्रेला उत्साहात सुरुवात झाली आहे.