3 जून रोजी भारतीय लष्कराने हा हल्ला सुरू केला होता. भारतीय सैन्यातल्या शूर जवानांनी आपल्या शौर्याने आणि लढाईच्या कौशल्याने अशक्य वाटणाऱ्या लढाईचं काही वेळातच विजयात रूपांतर केलं. कारगिल युद्धातल्या 21 तारखा खूप विशेष होत्या. या तारखा युद्धाच्या बदलत्या दिशेच्या साक्षीदार ठरल्या. कारगिल युद्धादरम्यान कोणत्या तारखेला काय घडलं होतं, याबाबत जाणून घेऊ या.
advertisement
3 मे : गारकौन गावात राहणारे मेंढपाळ ताशी नामग्याल आपल्या याकच्या शोधात कारगिलच्या बटालिक सेक्टरमध्ये पोहोचले. आधुनिक शस्त्रांनी सज्ज असलेल्या पाकिस्तानी घुसखोरांवर त्यांची दृष्टी पडली. ताशी नामग्याल यांनी सर्वप्रथम भारतीय लष्कराला याची माहिती दिली.
5 मे : ताशी नामग्याल यांच्याकडून मिळालेली माहिती भारतीय लष्कराने अत्यंत गांभीर्याने घेतली आणि पाकिस्तानी घुसखोरांची माहिती गोळा करण्यासाठी एक गस्त पथक पाठवलं. आधीच सज्ज असलेल्या पाकिस्तानी घुसखोरांनी भारतीय जवानांना ओलीस ठेवलं आणि नंतर त्यांची निर्घृण हत्या केली.
9 मे : भारतीय लष्कराला आपल्याबाबत माहिती मिळाली आहे, याचा अंदाज येताच पाकिस्तानी सैन्याने हल्ला केला. त्यांनी कारगिल परिसरात असलेल्या भारतीय लष्कराच्या छावण्या आणि दारूगोळा डेपोंना लक्ष्य करून हल्ला केला.
10 मे : कारगिलच्या शिखरावर बसलेले घुसखोर पाकिस्तानी लष्कराचे सैनिक आणि अधिकारी असल्याची खात्री भारतीय लष्कराला झाली होती. याशिवाय द्रास, कद्रस, काकसर आणि मुश्कोह सेक्टरमध्येही पाकिस्तानी लष्कराची उपस्थिती नोंदवण्यात आली.
14 मे : भारतीय लष्कराचे कॅप्टन सौरभ कालिया यांना पाकिस्तानी घुसखोरांचा शोध घेण्यासाठी पाठवण्यात आलं. या ऑपरेशनमध्ये कॅप्टन सौरभ कालिया यांच्यासोबत अर्जुन राम, भंवरलाल बगारिया, भिका राम, मूल राम आणि नरेश सिंह हे जवान होते.
25 मे : भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी देशाला कारगिलमधल्या घुसखोरीची माहिती दिली.
26 मे : भारतीय भूमीवर उपस्थित असलेल्या शत्रूचा पराभव करण्यासाठी भारतीय वायुसेनेने ऑपरेशन विजय सुरू केलं. ऑपरेशन विजयअंतर्गत, घुसखोरांच्या वेशात असलेल्या पाकिस्तानी सैनिकांवर आणि त्यांच्या स्थानांवर हवाई हल्ले सुरू करण्यात आले.
27 मे : ऑपरेशन विजयसाठी निघालेल्या भारतीय हवाई दलाच्या मिग-21 आणि मिन-27 या विमानांना पाकिस्तानच्या हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांचा फटका बसला. या हल्ल्यानंतर मिग-27चे पायलट फ्लाइट लेफ्टनंट कंबंपथी नचिकेता यांना आपत्कालीन एक्झिट घ्यावी लागली. सीमेपलीकडे लँडिंग केल्यामुळे, फ्लाइट लेफ्टनंट कंबंपथी नचिकेता यांना शत्रूने युद्धकैदी बनवलं.
28 मे : पाकिस्तानी लष्कराला नेस्तनाबूत करण्याच्या उद्देशाने उड्डाण करणारं भारतीय हवाई दलाचं एमआय-17 हे विमान गोळीबाराच्या तडाख्यात सापडलं. या हल्ल्यात एमआय-17 क्रूच्या चार सदस्यांनी देशासाठी बलिदान दिलं.
1 जून : कारगिलच्या शिखरावर बसलेल्या पाकिस्तानी लष्कराने श्रीनगरपासून लडाखला जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकवर गोळीबार सुरू केला. या गोळीबारात पाकिस्तानी लष्कराने, भारतीय लष्कराची रसद आणि लष्करी साहित्य घेऊन जाणाऱ्या ट्रक्सना लक्ष्य केलं होतं.
3 जून : भारताच्या राजनैतिक आणि लष्करी दबावापुढे पाकिस्तानने शरणागती पत्करण्यास सुरुवात केली. याचा पहिला पुरावा 3 जून 1999 रोजी समोर आला. या दिवशी पाकिस्तानने फ्लाइट लेफ्टनंट कंबंपथी नचिकेताची यांची सुटका केली.
5 जून : पाकिस्तानी लष्कराच्या ताब्यातून जप्त केलेली कागदपत्रं भारताने सार्वजनिक केली. कारगिलच्या शिखरावर बसलेले घुसखोर पाकिस्तानी लष्कराचे सैनिक असल्याचं जगजाहीर झालं.
6 जून : पाकिस्तानी लष्कराचा अभिमान पायदळी तुडवण्याच्या उद्देशाने भारतीय लष्कराचे शूर जवान पुढे सरसावले. भारतीय लष्कराने कारगिल परिसरात मोठा हल्ला केला.
9 जून : भारतीय लष्कराच्या जिद्द आणि शौर्यासमोर पाकिस्तानी लष्कराने शरणागती पत्करण्यास सुरुवात केली. भारतीय लष्कराने बटालिक सेक्टर अंतर्गत असलेल्या दोन प्रमुख स्थानांवर पुन्हा एकदा भारतीय ध्वज फडकवला.
11 जून : पाकिस्तानचे जनरल परवेझ मुशर्रफ आणि लेफ्टनंट जनरल अझीझ खान यांच्यातलं संभाषण भारतीय लष्कराने इंटरसेप्ट केलं. यातून पाकिस्तानचा वाईट हेतू संपूर्ण जगासमोर उघड झाला.
13 जून : द्रासमधल्या तोलोलिंग शिखरावर घुसखोरांच्या वेशात आलेल्या पाकिस्तानी सैनिकांना भारतीय लष्कराने ठार केलं. बहुतांश शत्रू मारले गेले आणि जे जिवंत राहिले त्यांना पळून जावं लागलं. भारतीय लष्कराने तोलोलिंगच्या शिखरावरही भारतीय ध्वज फडकवला.
4 जुलै : सलग यश मिळवत भारतीय लष्कराने टायगर हिलकडे मोर्चा वळवला. 12 तास चाललेल्या प्रदीर्घ युद्धानंतर भारतीय लष्कराने पुन्हा एकदा टायगर हिलवर ताबा मिळवला.
5 जुलै : अशक्य वाटणाऱ्या लढाईत भारतीय लष्कराने जवळपास यश मिळवलं होतं. 5 जुलैचा दिवस संपण्यापूर्वी भारतीय लष्कराने द्रास सेक्टरचा पूर्ण ताबा घेतला होता.
7 जुलै : पाकिस्तानला आणखी एक झटका देऊन भारतीय लष्कराने बटालिक सेक्टरमधल्या जुबार हाइट्सवर पुन्हा ताबा मिळवला.
11 जुलै : भारतीय लष्कराच्या शौर्यापुढे अखेर पाकिस्तानला गुडघे टेकावे लागले. भारताने बटालिक सेक्टरमधल्या प्रमुख शिखरांवर पुन्हा भारतीय ध्वज फडकवला.
26 जुलै : भारतीय लष्कराच्या विजयानंतर कारगिल युद्धाच्या समाप्तीची अधिकृत घोषणा करण्यात आली.