उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये या विमानाला अपघात झाला. विमानाला आग लागली. त्यामुळे एका लहान मुलासह 18 प्रवाशांचा मृत्यू झाला. पायलट एकटाच बचावला मात्र तो गंभीर जखमी असल्याचं स्पष्ट झालं आहे. या विमानात एअरलाईनच्या चालक गटाचे दोन सदस्य, तांत्रिक विभागाचे काही कर्मचारी असे एकूण 19 प्रवासी होते. रेग्युलर मेंटेनन्ससाठी पोखरा येथे जात असताना हा अपघात झाला. नेपाळच्या नागरी उड्डाण प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार रनवे 02 वरुन उड्डाण केल्यानंतर काही वेळातच हे विमान डाव्या बाजूला वळलं आणि रनवेच्या पुढील भागात हा अपघात झाला. मदत कार्य लगेच सुरु करण्यात आलं मात्र तरी 18 प्रवाशांचा मृत्यू झाला. कॅप्टन मनीष रत्न शाक्य यांना हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी हलवण्यात आलं. इतर मृतांमध्ये को-पायलट एस. कटुवाल, एअरलाईन्स कर्मचारी आणि एका येमेनी नागरिकाचा समावेश आहे. एअरलाईन टेक्निशियन मनूराज शर्मा, त्यांची पत्नी प्रिजा खातीवाडा आणि त्यांचा चार वर्षांचा मुलगा आदिराज शर्मा यांचाही मृतांमध्ये समावेश आहे. प्रिजा ही नेपाळच्या ऊर्जा, जल संसाधन आणि सिंचन मंत्रालयात कॅाम्प्युटर ऑपरेटर म्हणून काम करत होती. मृतांची ओळख पटवताना प्रिजा आणि त्यांचा मुलगा हे आधी एअरलाईन कर्मचारी आहेत असं वाटलं, मात्र नंतर ते प्रवासी असल्याचं स्पष्ट झालं.
advertisement
एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार मृतांपैकी 15 जणांचा मृत्यू हा जागच्याजागी झाला आहे तर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना तिघांचा मृत्यू झाला आहे. मृतदेह त्रिभुवन युनिव्हर्सिटी टीचिंग हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या अपघातात बचावलेले कॅप्टन शाक्य हे 37 वर्षांचे आहेत. मात्र, त्यांची अवस्था अत्यंत नाजूक असल्याचं काठमांडू मेडिकल हॉस्पिटलकडून सांगण्यात आलं आहे. त्यांच्या डोळ्यांची आणि पाठीच्या कण्याची सर्जरी करण्यात येत आहे. त्यासाठी त्यांना न्यूरो इंटेन्सिव केअर युनिटमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली आणि गृहमंत्री रमेश लेख यांनी अपघाताच्या ठिकाणी भेट देऊन माहिती घेतली. ओली म्हणाले, या अपघातामुळे आम्ही दुःखी आहोत. अपघात कसा झाला याची माहिती घेत आहे. मृतांच्या कुटुंबाप्रती सहवेदनाही त्यांनी व्यक्त केली आहे. एअरपोर्टचे प्रमुख जगन्नाथ निरौला यांच्या मते काठमांडूहून पोखराला जाणारं विमान चुकीच्या दिशेला वळलं होतं असं बीबीसी न्यूज नेपाळीने स्पष्ट केलं आहे. या अपघातामागचं कारण अद्याप स्पष्ट नसलं तरी उड्डाणानंतर अवघ्या एका मिनिटात हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. सिहंदरबादमध्ये आयोजित कॅबिनेट मीटिंगमध्ये या अपघाताच्या चौकशीसाठी नेपाळच्या नागरी उड्डाण प्राधिकरणाचे माजी महानिदेशक रतीश चंद्र लाल सुमन यांच्या नेतृत्वाखाली पाच सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. त्यात नेपाळ एअरलाईन्सचे कॅप्टन दीपू ज्वारचन, श्री एअरलाईन्सचे संजय अधिकारी, प्रोफेसर सुदीप भट्टाराय, मुकेश डांगोल यांचा समावेश आहे. या समितीला रिपोर्ट देण्यासाठी 45 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
अपघातानंतर काही वेळासाठी एअरपोर्टचं कामकाज बंद ठेवण्यात आलं होतं. मात्र कालांतराने ते पुन्हा सुरु करण्यात आलं. नेपाळचा त्रिभुवन एअरपोर्ट हा अत्यंत कठीण धावपट्टी असलेल्या एअरपोर्ट्सपैकी एक असल्याचं मानलं जातं. त्याच्या भौगोलिक स्थानामुळे तिथे नेहमीच अपघातांचा धोका असतो. हिमालयाकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे इथलं हवामान कधीही बदलतं. त्याचा परिणाम विमान वाहतुकीवर होतो. नेपाळच्या नागरी उड्डाण विभागाच्या मते 1955 मध्ये इथे पहिला सगळ्यात मोठा अपघात झाला. त्यानंतर आतापर्यंत विमान अपघातात तब्बल 914 जणांचे मृत्यू झाले आहेत.
या एअरपोर्टवर 1992 मध्ये सगळ्यात गंभीर विमान अपघात झाला होता. त्यात 167 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सचं एक विमान काठमांडूत उतरत असताना हा अपघात झाला होता. त्यानंतर गेल्यावर्षी 2023 मध्ये यती एअरलाईन्सच्या विमानाचा अपघात झाला. त्यात 72 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. त्यात पाच भारतीय प्रवासी होते. यती एअरलाईन्सच्या एका विमानाचा जानेवारी 2023 मध्ये लँडिंगच्या काही मिनिटं पूर्वी अपघात झाला होता. 1992 मध्ये थाई एअरवेजच्या विमानालाही नेपाळमध्ये अपघात झाला होता. त्यात 113 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. मे 2022 मध्ये तारा एअरच्या एका विमानाचा अपघात झाला होता. त्यात 22 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. 2016 मध्ये तारा एअरच्याच एका विमानाचा अपघात झाला असता त्यात 23 जण दगावले होते. 2018 मध्ये यूएस-बांग्ला एअर ॲक्सिडेंटमध्ये 51 प्रवाशांचा मृत्यू झाला होता.