नवी दिल्लीचे डीसीपी देवेश महला यांनी दिलेल्या माहितीनुसार 'सलिल कपूर यांनी स्वत:वरच गोळी झाडल्याचा संशय आहे. घटनास्थळी आम्हाला एक लायसन्स असलेली पिस्तूल मिळाली आहे. तसंच एक चिठ्ठीही मिळाली आहे. या चिठ्ठीमध्ये चार जणांची नावं घेण्यात आली आहेत, यांच्यावर कपूर यांनी त्रास दिल्याचा आरोप केला आहे. चार जणांकडून कर्ज घेतलं होतं, हे कर्ज फेडण्यासाठी आपल्याला मानसिक आणि शारिरिक त्रास दिला जात आहे. सगळे धमक्या देत आहेत, त्यामुळे मी अडचणीत आहे, असं कपूर यांनी चिठ्ठीमध्ये लिहिलं आहे.'
advertisement
ऍटलासचे माजी अध्यक्ष होते सलिल कपूर
दिल्ली पोलिसांनी आरोप झालेल्यांची नावं जाहीर करायला नकार दिला आहे. चिठ्ठीमध्ये ज्यांच्या नावांचा उल्लेख करण्यात आला आहे, त्यांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं आहे. सलिल कपूर कर्जबाजारी झाले होते, तसंच त्यांचं बरेच जणांचं देणंही बाकी होतं. त्यांचा पत्नीसोबतही घटस्फोट झाला होता आणि मुलंही त्यांच्यासोबत राहत नव्हती. सलिल कपूर यांची वहिनी नताशा कपूर यांनीही 2020 साली याच घरात आयुष्य संपवलं होतं. नताशा या सलिल कपूर यांचे भाऊ संजय कपूर यांच्या पत्नी होत्या.
फसवणुकी प्रकरणी अटक
सलिल कपूर यांना 2015 साली फसवणुकीच्या दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली होती. पहिल्या प्रकरणात सत्येंद्र नाथ नावाच्या व्यक्तीने सलिल कपूर यांच्यावर 9 कोटी रुपये न दिल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी ईओडब्ल्यूने गुन्हा दाखल केला होता. सलिल कपूर यांनी 7 पोस्ट डेटेट चेक दिले होते, जे बाऊन्स झाले होते. पोलीस तपासादरम्यान साकेत कोर्टाने सलिल यांना फरार घोषित केलं होतं. आणखी एका प्रकरणात सुनिता बन्सल या महिलेने ईओडब्ल्यूकडे तक्रार दिली होती, ज्यात सलिल कपूर यांच्यावर 4 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
2020 साली बंद झालं शेवटचं युनिट
1951 साली ऍटलास कंपनीने सायकल बनवायला सुरूवात केली होती, पण 2020 साली गाझियाबादच्या साहिबाबादमधलं ऍटलास कंपनीचं शेवटचं युनिट आर्थिक संकटामुळे बंद करण्यात आलं. यानंतर ऍटलास कंपनीचं देशातलं उत्पादनही बंद झालं. कंपनीने तेव्हा कर्मचाऱ्यांना पत्रही लिहिलं होतं. मागच्या अनेक वर्षांपासून कंपनी मोठ्या संकटातून जात आहे. कंपनीने उपलब्ध असलेले सगळे फंड खर्च केले आहेत, तसंच आता दुसरा कोणताही आर्थिक स्त्रोत उपलब्ध नाही, त्यामुळे कच्चा मालही खरेदी करता येत नाहीये, त्यामुळे फॅक्ट्री सुरू राहू शकत नाही. सगळ्या कर्मचाऱ्यांनी 3 जून 2020 नंतर कामावर येऊ नये, असं कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात नमूद करण्यात आलं होतं.
1951 साली सुरू झालेली ऍटलास सामान्य माणसासाठीची सायकल बनली होती. ऍटलास सायकलबद्दल लोकांच्या लहानपणीच्या आठवणी जोडल्या गेल्या होत्या, पण सायकलच्या जगातलं हे मोठं नाव हळू हळू विस्मरणात गेलं. परिस्थिती इतकी वाईट झाली की या कंपनीच्या मालकाला शेवटी स्वत:चंच आयुष्य संपवावं लागलं.