राणी दुर्गावती यांचा जन्म 5 ऑक्टोबर 1524 रोजी बुलंदेलखंडमधल्या सध्याच्या बांदा जिल्ह्यात झाला. दुर्गाष्टमीच्या दिवशी जन्म झाल्यामुळे त्यांचं नाव दुर्गावती ठेवण्यात आलं होतं. कालिंजरचे राजे कीर्तिसिंह चंदेल यांना दुर्गावती ही एकमेव मुलगी होती. आई-वडिलांचं एकमेव अपत्य असल्यामुळे दुर्गावतींचं लाडाकोडात पालनपोषण झालं. त्यांनी लहानपणापासूनच घोडेस्वारी, तिरंदाजी आणि तलवारबाजी यांसारख्या युद्धकला शिकण्यास सुरुवात होती. तिरंदाजी आणि बंदुकीतून नेम साधण्यात त्यांनी विशेष कौशल्य प्राप्त केलं होतं.
advertisement
1542मध्ये दुर्गावतींचा गोंड राजा दलपतशहाशी विवाह झाला. राजा दलपतशहाने गोंड राजघराण्यातल्या चार राज्यांपैकी गारमंडला, चांदा, देवगड आणि खेरला या राज्यांवर राज्य केलं. लग्नानंतर सात वर्षांनीच राजा मरण पावला. त्या वेळी त्यांचा मुलगा फक्त पाच वर्षांचा होता. राणी दुर्गावती यांनी आपला पाच वर्षांचा मुलगा वीर नारायणला गादीवर बसवून गोंडवनाची सत्ता आपल्या हातात घेतली. सध्याचं जबलपूर हे त्यांच्या राज्याचं केंद्र होतं. राणी दुर्गावतींनी सुमारे 16 वर्षं राज्य केलं.
1556मध्ये माळव्यातला सुलतान बाजबहादूर याने गोंडवनावर हल्ला केला. राणी दुर्गावतीच्या शौर्यामुळे आणि धैर्यामुळे त्याची डाळ शिजली नाही. 1562मध्ये अकबराने माळवा ताब्यात घेऊन मुघल साम्राज्याशी जोडला. तसंच रीवावर आसफ खानने वर्चस्व प्रस्थापित केलं. रीवा आणि माळवा या दोन्ही राज्यांच्या सीमा गोंडवनाला लागून होत्या. त्यामुळे गोंडवनही मुघलांच्या डोळ्यांसमोर आलं. अकबराला गोंडवनदेखील आपल्या साम्राज्यात पाहिजे होतं. आसफ खानने गोंडवनावर हल्ला केला; पण राणी दुर्गावतीच्या शौर्यापुढे त्याला माघार घ्यावी लागली. राणी दुर्गावतीकडे सैनिकांची संख्या कमी होती. तरीही त्यांनी युद्ध सुरूं ठेवलं. सेनापती शहीद होऊनही त्यांनी सैनिकांचं धैर्य खचू दिलं नाही. मुघलांनाही याचं आश्चर्य वाटलं होतं.
1564मध्ये आसफ खानने पुन्हा गोंडवनावर हल्ला केला. या युद्धात राणी दुर्गावती आपल्या हत्तीवर स्वार होऊन आल्या होत्या. युद्धात मुलगाही सोबत होता. युद्धात राणी दुर्गावतींना अनेक बाण लागले आणि त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांचा मुलगाही जखमी झाला होता. राणीने त्याला सुरक्षित ठिकाणी पाठवलं. दरम्यान, बाण लागल्याने राणी बेशुद्ध झाली. ती शुद्धीवर येईपर्यंत मुघलांनी युद्ध जिंकलं होतं. माहुताने राणीला पळून जाण्याचा सल्ला दिला होता; पण राणीने तसं केलं नाही. यापुढे आपण मानाने जिवंत राहू शकणार नाही याची खात्री होताच राणीने दिवाण आधार सिंहला आपला जीव घेण्यास सांगितलं होतं. दिवाणाने राणीचा जीव घेण्यास नकार दिल्यावर राणी दुर्गावतीने स्वतःच आपला खंजीर उचलून छातीत खुपसून घेतला.