1949 मध्ये सॅन्डर मिकस यांनी स्टॅलिनच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त या हा पुतळा साकारला होता. मूळ शिल्प मॉस्कोला स्टॅलिनकडे पाठवण्यात आलं आणि डिसेंबर 1951 पर्यंत त्याच्या विशाल प्रतिकृतीचे हंगेरीमध्ये उदघाटन करण्यात आलं. मिकसने तयार केलेल्या पुतळ्यातून असा संदेश जात होता की, स्टालिन एक आनंददायी आणि मैत्रीपूर्ण व्यक्ती आहे. त्याच्याशी कोणीही सहज संपर्क साधू शकतो. 8 मीटर उंचीचा हा पुतळा 18 मीटर उंच असलेल्या चौथऱ्यावर उभा होता. बुडापेस्टमधील स्टॅलिन स्क्वेअरच्या मधोमध हा पुतळा उभारण्यात आला होता.
advertisement
1953 मध्ये जोसेफ स्टॅलिनचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याच्या पक्षातील समाजवादी वास्तववाद कमी झाला. हंगेरीतील लोकांना ही बाब रुचली नाही. 23 ऑक्टोबर 1956 रोजी संध्याकाळी लाखो लोक त्याच्या पुतळ्याजवळ जमा झाले. या संतप्त नागरिकांनी पुतळा खाली ओढण्यास सुरुवात केली. अनेकांनी चौथऱ्यावर चढण्यातच विशेष आनंद मानला. कारण, तिथे कोणत्याही सामान्य माणसाला प्रवेश करण्याची परवानगी नव्हती. नागरिकांनी काँक्रिट ब्लॉकच्या आतील भागात असलेल्या उच्च अधिकाऱ्यांच्या वेटिंग रूममध्ये देखील प्रवेश केला.
सुरुवातीला लोकांनी ट्रॅक्टर आणि स्टीलच्या केबल्सच्या मदतीने पुतळा खाली ओढण्याचा प्रयत्न केला. पण, पुतळा जागेवरून हलला नाही. त्यानंतर जेव्हा कारखान्यांमधून कामगार या चौकात आले तेव्हा त्यांनी आपल्यासोबत फ्लेम-कटिंग मशीन आणलं. या मशीनच्या मदतीने बुटांपासून पुतळा कापण्यात आला. पुतळ्याचं धड क्रांतीचं प्रतीकात्मक चिन्ह बनलं. जेव्हा पुतळा खाली आला तेव्हा तो ब्लाहा लुज्जा स्क्वेअरवर (Blaha Lujza) नेला गेला. तिथे लोकांनी त्याचे अनेक तुकडे केले.
हंगेरीतील क्रांतीच्या काळात हा पुतळा तसाच पडून राहिला. तो सामान्य लोकांच्या बैठकीचं आणि चर्चेचं ठिकाण बनला. ज्या चौकात स्टॅलिनचा पुतळा उभारण्यात आला होता त्या जागी आता 1956 च्या क्रांतीचे स्मरण करणारं स्मारक उभं आहे.