राजीव गांधींच्या घराबाहेर दोन पोलिसांनी चहा प्यायला अन् सरकार पडलं
पोलिसांनी एखाद्या नेत्याच्या घराबाहेर चहा पित उभा राहणं, तशी सामान्य बाब वाटत असली तरी यामागे मात्र भयंकर कट होता. या कटाची कुणकुण जेव्हा राजीव गांधींना लागली. तेव्हा याचे असे पडसाद उमटले की थेट केंद्रातील चंद्रशेखर याचं सरकार पडलं. त्यावेळी नेमकं काय झालं होतं. राजीव गांधींच्या घराबाहेर केवळ चहा प्यायल्याने सरकार कसं पडलं? याचीच ही स्टोरी.
advertisement
तर ही गोष्ट आहे, मार्च 1991 मधली. त्यावेळी राजीव गांधी यांच्या 10 जनपथ येथील निवासस्थानाबाहेर दोन हरियाणा पोलीस चहा पिताना आढळले होते. काँग्रेसच्या आरोपानुसार, हे दोन्ही पोलीस साध्या वेशात राजीव गांधींच्या घराबाहेर थांबले होते. दोघंही हरियाणा सीआयडीचे पोलीस कर्मचारी होते. ते राजीव गांधींवर हेरगिरी करत होते. वरंवर पाहता काँग्रेसचा हा आरोप कानाडोळा करण्यासारखा वाटत असेल. मात्र ही घटना अत्यंत गंभीर होती. याचं कारण म्हणजे या घटनेआधी 1985 मध्ये भारतात घडलेलं मोठं हेरगिरी कांड.
1985 मधील भारतातील हेरगिरी कांड
ही हेरगिरी थेट भारत सरकारच्या उच्च-पदस्थ अधिकाऱ्यांकडून केली जात हेती. हे अधिकारी परदेशी गुप्तचर यंत्रणांना संवेदनशील माहिती पुरवत होते. या प्रकरणात, पीसी अलेक्झांडर यांचे खासगी सचिव टी.एन. कुट्टी यांना अटक करण्यात आली होती. कुट्टी हे फ्रेंच आणि सोव्हिएत गुप्तहेरांना गोपनीय माहिती विकत असल्याचं समोर आलं होतं. यानंतर पीसी अलेक्झांडर यांना राजीनामा देखील द्यावा लागला होता. हे प्रकरण ताजं असताना राजीव गांधी यांच्यावर अशाप्रकारे हेरगिरी सुरू असल्याने या हेरगिरीला देखील तितकंच महत्त्व होतं.
या हेरगिरीचा वाद पुढे इतका वाढला की, केंद्रातील सरकार पडलं. तत्कालीन पंतप्रधान चंद्रशेखर यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. चंद्रशेखर हे काँग्रेसच्या पाठिंब्यावर पंतप्रधान झाले होते. विशेष म्हणजे त्यावेळी काँग्रेस हा देशातील सर्वात मोठा पक्ष होता, तरीही काँग्रेसला सत्तेबाहेर राहावं लागलं होतं. अशा स्थितीत हे हेरगिरी प्रकरण समोर आल्यानंतर काँग्रेसनं चंद्रशेखर यांचा पाठिंबा काढून घेतला. यामुळे त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आणि त्याचं सरकार कोसळलं.
1989 ची राजकीय समीकरणं
आता चंद्रशेखर आणि राजीव गांधीच्या कथित हेरगिरीचं कनेक्शन समजून घेण्याआधी आपल्याला तत्कालीन राजकीय पार्श्वभूमी समजून घ्यावी लागेल. तर तेव्हा 1989 ची निवडणूक ही काँग्रेससाठी अत्यंत वादळी ठरली होती. बोफोर्स घोटाळा, विश्वनाथ प्रताप सिंह यांनी केलेला बंड आणि पंजाबमधील दहशतवाद, खलिस्तानची मागणी अशा सगळ्या घडामोडींमुळे 1989 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला होता. त्यांना बहुमतापेक्षा खूपच कमी 197 जागा मिळाल्या. स्वबळावर सत्तेत येणं काँग्रेसला अशक्य होतं.
अशा स्थितीत जनता दल (143 जागा), भाजप (85) आणि डाव्या पक्षांनी (52) एकत्र येऊन व्ही. पी. सिंह यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले. पण हे सरकार फार काळ टिकलं नाही. भाजपने पाठिंबा काढून घेतला. यानंतर जनता दलाचे वजनदार नेते चंद्रशेखर पक्षातून बाहेर पडले. पण ते पक्षातून बाहेर जाताना स्वत:सोबत 64 खासदारांना घेऊन गेले. यानंतर त्यांनी समाजवादी जनता पक्षाची स्थापना केली. व्ही पी सिंह यांचं सरकार एका वर्षापेक्षा कमी कालावधीत कोसळलं.
ही राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन राजीव गांधींनी मोठा डाव खेळला होता. जनता पक्षातून बाहेर पडलेल्या चंद्रशेखर यांना पंतप्रधानपदी बसवलं. स्वत:कडे 197 खासदार असूनही त्यांनी 64 खासदारांचा पाठिंबा असलेल्या चंद्रशेखर यांना पीएम केलं. सर्व काही सुरळीत सुरू होतं. पण या कथित हेरगिरीमुळे राजीव गांधी प्रचंड संतापले. त्यांनी चंद्रशेखर यांच्या सर्व सूचना धुडकावून लावल्या. चंद्रशेखर यांनी हेरगिरी प्रकरणावर स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. पण याचा फारसा फायदा झाला नाही.
चंद्रशेखर आणि हेरगिरीचं कनेक्शन काय?
तर, चंद्रशेखर यांचा या कथित हेरगिरीशी थेट संबंध नव्हता. पण राजीव गांधींच्या घराबाहेर आढळलेले दोन्ही पोलीस हरियाणातील सीआयडी पथकाचे होते. त्यावेळी हरियाणात समाजवादी पक्षाचे प्रमुख नेते ओम प्रकाश चौटाला यांचं सरकार होतं. यावरून काँग्रेसने असा निष्कर्ष काढला की ही कथित हेरगिरी चंद्रशेखर यांच्या सांगण्यावरून चौटाला यांनी केली असावी. हा निष्कर्ष सत्य मानून काँग्रेसनं चंद्रशेखर सरकारचा पाठिंबा काढून घेतला.
ओम प्रकाश चौटालांच्या भावाने राजीव गांधींना टीप दिली
यावरून त्यावेळी विविध अफवा पसरल्या होत्या. हरियाणाच्या राजकीय वर्तुळात एक अफवा अशी होती की, चौटाला हे राजीव गांधींची हेरगिरी करत आहेत, याची माहिती चौटाला यांचे वेगळे झालेले भाऊ रणजीत सिंह यांनी फोडली होती. त्यांनीच राजीव गांधींना अलर्ट केलं होतं. रणजीत सिंह हे वडील देवीलाल यांच्या नेतृत्वाखालील हरियाणा सरकारमध्ये मंत्री होते. त्यामुळे तेही हरियाणातील मोठे प्रस्थ होते. त्यांनी कथित हेरगिरीची माहिती देण्यासाठी स्वतःच्या नेटवर्कचा वापर केला होता.
...अन् चंद्रशेखर यांनी राजीनामा दिला
राजीव गांधींकडे काहीतरी ठोस पुरावे होते, त्यामुळेच त्यांनी चंद्रशेखर सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याचं सांगितलं जातं. यानंतर 6 मार्च 1991 रोजी चंद्रशेखर यांना राजीनामा द्यावा लागला. पुढे जून महिन्यात संसद आणि इतर काही राज्यांसाठी निवडणुका जाहीर झाल्या आणि हे हेरगिरी प्रकरण मागे पडलं. याचा कोणत्याही सरकारने पाठपुरावा केला नाही किंवा तळाशी जाण्याचा प्रयत्न केला नाही. पुढे निवडणूक प्रचारादरम्यान राजीव गांधींची हत्या झाली.
हेही वाचा - लग्नाला गेलेल्या मुख्यमंत्र्यांचा बदलला मूड, नाईट ड्रेस आणण्यासाठी 1500 किमी पाठवलं सरकारी विमान
एका मुख्यमंत्र्याने केवळ नाईट ड्रेस आणण्यासाठी श्रीनगरहून थेट भोपाळला सरकारी विमान पाठवलं होतं. हे अंतर तब्बल १५०० किलोमीटर पेक्षा अधिक आहे. आता हे मुख्यमंत्री कोण होते? त्यांनी असं का केलं? याचीच ही स्टोरी! वाचा सविस्तर