प्रश्न: हश मनी म्हणजे काय?
उत्तर: एखादी व्यक्ती किंवा पक्ष दुसऱ्या व्यक्ती किंवा पक्षाला मोठ्या रकमेचं आमिष देतो जी रक्कम मिळाल्यावर पहिल्या व्यक्तीने केलेली लज्जास्पद किंवा जगजाहीर न करता येणारी कृती दुसरी व्यक्ती कुणाला सांगत नाही. हे आमिष, प्रलोभन देण्याच्या व्यवस्थेलाच ‘हश मनी’ म्हणतात. हे पैसे असंतुष्ट प्रतिस्पर्ध्याला शांत करण्यासाठी दिलेले पैसे असू शकतात. लज्जास्पद माहिती उघड करू शकणाऱ्या विरोधकाला देखील असे पैसे दिले जातात. कायदेशीर खटला टाळण्यासाठी आरोपी व्यक्ती गुपचूप हे पैसे देते.
advertisement
प्रश्न: हश मनीचं प्रकरण गंभीर कधी मानलं जातं?
उत्तर: अमेरिकेत पैशाच्या नोंदी ठेवणे ही एक गंभीर आणि कायदेशीर बाब आहे. विशेषत: जेव्हा तुम्ही हे पैसे इतर कोणत्याही वस्तूच्या नावाखाली तुमच्या कंपनीकडून किंवा तुमच्या पैशाच्या नोंदीतून देत असाल तर कायदेशीर महत्त्व अधिक वाढतं. अशा प्रकारे पैशांचा वापर केल्यास किंवा एखादी व्यक्ती गप्प बसावी म्हणून तिला पैसे दिल्याचे सिद्ध झालं, तर ही बाब गंभीर ठरते.
प्रश्न : ट्रम्प यांनी सर्व 34 खात्यांमध्ये फेरफार केल्याचं पुन्हा-पुन्हा का म्हटलं जात आहे?
उत्तर: आपले पैशांचे व्यवहार रेकॉर्ड करता येतात आणि ही संपूर्ण प्रक्रिया रेकॉर्ड करण्यासाठी अनेक स्टेप्स आहेत. ट्रम्प यांच्या प्रकरणामध्ये अशा व्यवहाराच्या नोंदी 34 स्टेप्समध्ये दाखवल्या होत्या. सर्व 34 प्रकरणांमध्ये ज्युरींनी याबाबत चूक काढली आहे. ट्रम्प यांच्या खात्यांच्या लेजरवरून स्पष्ट झालं आहे की, त्यांनी हश मनी देण्यासाठी खोट्या रेकॉर्डची नोंद केली आहे.
प्रश्न : अमेरिकेत ही बाब किती गंभीर आहे आणि त्यात किती शिक्षा होऊ शकते?
उत्तर: बिझनेस रेकॉर्डमध्ये फेरफार केल्याच्या आरोपामुळे चार वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. या प्रकरणामध्ये अडकलेल्या ट्रम्प यांना किती शिक्षा होणार हे स्पष्ट झालं नसलं तरी त्यांचा हा अशा प्रकारचा पहिलाच गुन्हा असल्याने त्यांना अत्यंत किरकोळ शिक्षा होण्याची देखील शक्यता आहे. कदाचित त्यांना फक्त 5000 डॉलर्सचा दंड भरण्यास सांगितलं जाईल. पहिल्यांदाच गुन्हा सिद्ध झाल्याने ट्रम्प यांना तुरुंगवासाची शिक्षा होण्याची शक्यता फारच कमी आहे, असं कायदेतज्ज्ञांचे मत आहे.
प्रश्न : ट्रम्प यांनी कोणत्या प्रकरणात हश मनी पेमेंट केलं होतं?
उत्तर : 2016 मध्ये माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प निवडणूक लढवत असताना, त्यांनी गुप्तपणे अडल्ट फिल्म अॅक्ट्रेस स्टॉर्मी डॅनियल्सने आपलं तोंड बंद ठेवावं यासाठी तिला 130,000 डॉलर्स दिले होते. त्यांनी हे पैसे माजी वकील मायकल कोहेन यांच्यामार्फत दिले आहेत. वेगळ्या वस्तूच्या नावाखाली या पैशांची नोंद केली होती. नंतर कोहेन यांनीच हे प्रकरण उघडकीस आणलं. ट्रम्प यांच्यावर 34 प्रकरणांमध्ये रेकॉर्ड खोटे सादर केल्याचा आरोप आहे.
प्रश्न: अशा आरोपांमध्ये दोषी ठरलेले ट्रम्प हे पहिलेच अमेरिकन नेते आहेत का?
उत्तर : कथित नात्यासाठी पैसे दिल्याचा आरोप असणारे ट्रम्प हे पहिले राजकारणी नाहीत. एकेकाळचे डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार जॉन एडवर्ड्स यांच्यावर देखील प्रचाराचे आर्थिक कायदे मोडल्याचा आरोप होता. ट्रम्प यांच्यावर पैसे देण्याबाबत गुन्हा दाखल झाला नसून ते देण्याचा पद्धतीवरून गुन्हा दाखल झाला आहे.
अमेरिकेत बलात्कारासारख्या प्रकरणांमध्ये काय आहे शिक्षा?
उत्तर: हे प्रकरणाच्या गंभीरतेवर अवलंबून असते. अमेरिकेतील वेगवेगळ्या राज्यांमध्ये शिक्षाही वेगवेगळी आहे. मात्र, तिथे बलात्काराच्या घटनांकडे दोन प्रकारे पाहिलं जातं. प्रकरण सौम्य असेल तर फक्त तीन महिन्यांची शिक्षा होऊ शकते. प्रकरण गंभीर असेल तर 30 वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते.
