या बैठकीनंतर महात्मा गांधींना ब्रिटिश सरकारने अटक केली होती. पाच वर्षांपूर्वीचा तो दिवस आणि आजच्या दिवसाने त्यांच्या मनात पिंगा घालायला सुरुवात केली. 1942 मधील 8 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य मिळेल की नाही याची खात्री नव्हती. तरीदेखील प्रत्येकाच्या मनात उत्साह होता; पण 1947च्या 8 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दृष्टिक्षेपात होतं. अवघ्या आठवडाभराने देशाला स्वातंत्र्य मिळणार होतं. तरीदेखील कोणाच्याच मनात उत्साह नव्हता. गेल्या दोन-तीन दिवसांत निर्वासित छावणी आणि लाहोरमधल्या हिंदू-शीख कुटुंबांचे हाल पाहून ते दु:खी झाले होते. यासोबतच आपलं उरलेलं आयुष्य पाकिस्तानात घालवण्याची घोषणाही त्यांनी केली.
advertisement
जोधपूर काबीज करण्यासाठी केले प्रयत्न
भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीच्या घोषणेसह मोहम्मद अली जिना यांनी जोधपूर, कच्छ, उदयपूर आणि बडोदा या संस्थानांचं पाकिस्तानात विलीनीकरण करण्यासाठी कट रचण्यास सुरुवात केली होती. यासाठी भोपाळच्या नवाबाला आपला 'इक्का' बनवलं होतं. भोपाळच्या नवाबामार्फत जोधपूर संस्थानच्या महाराजांचं मन वळवण्याचाही प्रयत्न सुरू होता. जिना यांनी जोधपूरच्या महाराजांना प्रस्ताव दिला होता, की जर त्यांनी 15 ऑगस्टपूर्वी आपल्या राज्याला स्वतंत्र घोषित केलं तर पाकिस्तान त्यांच्यावर महागड्या राजकीय भेटवस्तूंचा वर्षाव करील. या मौल्यवान राजकीय भेटवस्तूंमध्ये शस्त्रास्त्रांचा पुरवठा, दुष्काळ पडल्यास अन्नपुरवठा, जोधपूर-हैदराबाद रेल्वे मार्ग आणि कराची बंदरावर जोधपूर संस्थानाचे हक्क यांचा समावेश होता.
जिनांच्या आमिषांना जोधपूरचे महाराजा बळी पडण्यापूर्वीच कदंबी शेषाचारी व्यंकटाचारी मध्ये आले. भारतीय नागरी सेवक परीक्षा उत्तीर्ण झालेले व्यंकटाचारी त्या काळात जोधपूरचे दिवाण होते. त्या काळात जोधपूर राज्याचा कोणताही निर्णय व्यंकटाचारी यांच्या सल्ल्याशिवाय घेतला जात नव्हता. व्यंकटाचारी यांना जिनांचा कट लक्षात आला होता.
त्या काळात व्हाइसरॉय लॉर्ड माउंटबॅटन यांनाही जोधपूर राज्य पाकिस्तानसोबत जावं असं वाटत नव्हतं. व्हाइसरॉय लॉर्ड माउंटबॅटन यांना माहिती होतं, की त्यांची इच्छा पूर्ण करण्याची ताकद फक्त व्यंकटाचारी यांच्याकडे आहे. माउंटबॅटन यांनी व्हाइसरॉय हाउसमध्ये व्यंकटाचारी यांना जेवणासाठी बोलावलं. 8 ऑगस्ट 1947 रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास व्यंकटचारी जोधपूर राज्यातल्या एका आलिशान कारमधून व्हाइसरॉय हाउसमध्ये पोहोचले. जोधपूर संस्थानाकडून इंग्रजांना नेहमी मदत मिळाली होती. त्यामुळे व्हाइसरॉयच्या घरात व्यंकटाचारी यांची चांगली बडदास्त ठेवली गेली.
जेवणाच्या वेळी व्हाइसरॉयने व्यंकटाचारी यांच्याकडे मनातल्या भावना व्यक्त केल्या. जोधपूर संस्थानाने शक्य तितक्या लवकर भारतात विलीन होण्याची घोषणा करावी, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. त्यावेळी व्यंकटाचारी यांनीदेखील स्पष्ट केलं, की जोधपूर संस्थान भारतात विलीन होण्यासाठी तयार आहे. व्यंकटाचारी यांनी अतिशय हुशारीने जोधपूरच्या महाराजांना जिनांच्या बोलण्यात अडकण्यापासून वाचवलं आणि नंतर त्यांना भारतात विलीन होण्यास तयार केलं. व्यंकटाचारीच्या हुशारीमुळे जिनांच्या इच्छा धुळीला मिळाल्या.
कोलकात्यात हिंसाचार
यादरम्यान, कोलकात्यात (तत्कालीन कलकत्ता) दंगे सुरू झाले होते. कोलकात्यातल्या सर्व वस्त्या एक-एक करून जाळल्या जात होत्या. संपूर्ण कोलकात्यात हिंसाचार टिपेला पोहोचला होता. काही हिंदू कुटुंबांना वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर दंगलखोरांनी गावठी बॉम्बने हल्ला केला होता. या हल्ल्यात पोलीस उपायुक्त एस. एच. घोष, एफ. एम. जर्मन यांच्यासह अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी गंभीर जखमी झाले होते. 8 ऑगस्ट 1947 च्या संध्याकाळपर्यंत दंगल कोलकात्यापासून हैदराबाद, वारंगल आणि निजामशाही या गावांपर्यंत पसरली होती. दंगलखोर हिंदूंच्या घरांवर आणि दुकानांवर सातत्याने हल्ले होत होते. या दंगलीतल्या आगीच्या ज्वाळांमध्येच 8 ऑगस्ट 1947 चा सूर्य मावळला.