तुम्ही जर शरीरातील व्हिटॅमिन डी ची कमतरता भरून काढण्यासाठी इंजेक्शन घेण्याचा विचार करत असाल, तर सावध व्हा. कारण यामुळे तुमच्या आरोग्यावर भविष्यात विपरित परिणाम होऊ शकतात. हिवाळा सुरू झाल्यामुळे सतत पडणाऱ्या धुक्यामुळे व्हिटॅमिन डी चा नैसर्गिक स्रोत असलेल्या सूर्यप्रकाशातून आवश्यक तेवढं व्हिटॅमिन डी शरीराला मिळत नाही. पण अशा शरीरातील व्हिटॅमिन डी 3 ची पातळी वाढवण्यासाठी इंजेक्शन घेणं हा चांगला पर्याय ठरू शकत नाही, असं वैद्यकीय तज्ज्ञांचं मत आहे.
advertisement
डॉक्टरांच्या मते, इंजेक्टेबल म्हणजे इंजेक्शनने दिलेलं व्हिटॅमिन डी टाळलं पाहिजे. कारण त्यामुळे शरीरात जास्त प्रमाणात व्हिटॅमिन डीची पातळी वाढल्यास किडनी स्टोन होऊ शकतो. तसेच संशोधनातून असं समोर आलं आहे की, असं इंजेक्शन वर्षातून एकदाच घेणं देखील महागात पडू शकते. यामुळे हाडं खराब होण्याचा धोका असतो.
डॉक्टर काय म्हणतात?
एम्स हॉस्पिटलमधील एंडोक्राइनोलॉजी आणि मेटाबॉलिझम विभागाचे डॉ. रविंदर गोस्वामी यांनी सांगितलं की, ‘सहा लाख युनिट व्हिटॅमिन डी इंजेक्शनद्वारे घेतल्यानं हाडांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो.शरीराची सामान्य पातळी राखण्यासाठी महिन्याला 60,000 IU सॅशे पुरेसं असतं,’ नवी दिल्लीतील युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल सायन्सेसचे डायरेक्टर एस. ही. मधू म्हणाले,‘कॅल्सीट्रिॉलसारखे सक्रिय ॲनालॉग देखील सामान्य व्हिटॅमिन डी कमतरता भरून काढण्यासाठी उपयुक्त नाहीत, कारण ते विशेषतः मूत्रपिंडाच्या आजारांवर उपचार करण्यासाठी तयार केलेले असतात.’ ‘ शरीरातील व्हिटॅमिन डी ची कमतरता आणि अधिक प्रमाणात कॅल्शिअम, फ्लोराईड घेतल्याचा शरीरावर विपरित परिणाम होऊ शकतो. शरीराची दैनंदिन एक ग्रॅम कॅल्शिअम ची गरज एक ग्लास दुधातून ही भागू शकते,’ असंही डॉ गोस्वामी म्हणाले.
शरीरात व्हिटॅमिन डी चं प्रमाण कमी असेल तर
शरीरातील व्हिटॅमिन डीची कमतरता हाडांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करते. कारण आतड्यांतील पेशींमध्ये कॅल्शियम वाहतूक करणारे घटक तयार करण्यात व्हिटॅमिन डीची महत्त्वपूर्ण भूमिका असते. ही प्रक्रिया पचनमार्गात अन्नातून कॅल्शियमचं शोषण करण्यास सक्षम करते. जेव्हा कॅल्शियम आणि फॉस्फरस रक्तप्रवाहात असतात, तेव्हा ते शरीरातील हाडांची संरचना मजबूत करण्यासाठी एकत्रितपणे कार्य करतात.
असं मिळवा व्हिटॅमिन डी
नैसर्गिक व्हिटॅमिन डी मिळवण्यासाठी आकाश निरभ्र असताना सकाळी 10 ते दुपारी 2 दरम्यान दररोज 15-30 मिनिटे सूर्यप्रकाशात फिरा. काचेच्या पॅन्समधून सूर्यप्रकाश घेतल्यानं काहीही फायदा होत नाही. कारण काच त्वचेमध्ये व्हिटॅमिन डी निर्मितीसाठी आवश्यक अल्ट्राव्हायोलेट किरणांना अवरोधित करते. आपल्या रक्तातील अंदाजे 90 टक्के व्हिटॅमिन डी हे डी 3 असते. जे सूर्यप्रकाशातून मिळते. याशिवाय, सॅल्मन आणि कॉड सारख्या फॅटी मासे आणि अंडी देखील व्हिटॅमिन डीचे स्रोत आहे. परंतु यातील प्रमाण मर्यादित आहे. एक अंडी फक्त 20 IU व्हिटॅमिन डी पुरवते. त्यामुळे केवळ अंड्यांद्वारे दैनंदिन 1,000 IU ची आवश्यकता पूर्ण करता येणार नाही. अशा परिस्थितीत दररोज 500 ग्रॅम मासे खाणे फायदेशीर ठरू शकते. याशिवाय, तुम्हाला मशरूम आणि वनस्पतींमधून व्हिटॅमिन डी 2 मिळतील. डॉ गोस्वामी यांच्या मते, ‘दूध, संत्र्याचा रस किंवा पाण्यासोबत व्हिटॅमिन डी सप्लिमेंट्स घेता येतील. फक्त ते पिण्याआधी सप्लिमेंट तोंडात ठेवल्याची खात्री करा.’