Indrayani River: अलंकापुरीची इंद्रायणी की ‘फेस’गंगा? Video पाहाल तर आळंदीकरांसारखंच बोलाल!
- Reported by:Pooja Satyavan Patil
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Indrayani River: डिसेंबर महिन्यात नदीत मोठ्या प्रमाणात मृत माशांचा खच पडल्याची घटना घडली होती. आता फेसाळलेल्या पाण्यामुळे प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडली आहे.
पुणे: वारकरी संप्रदायाच्या श्रद्धेचे प्रतीक असलेली आणि देहू–आळंदी परिसरातून वाहणारी इंद्रायणी नदी गेल्या काही वर्षांपासून प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. अनेक कंपन्यांचे सांडपाणी थेट नदीपात्रात सोडले जात असल्याने पाण्याची गुणवत्ता ढासळली असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या गंभीर समस्येकडे शासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाबाबत स्थानिक नागरिकांच्या प्रतिक्रिया लोकल18 ने जाणून घेतल्या.
नदीची स्वच्छता फक्त कागदापुरती
इंद्रायणी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पास प्रशासनाकडून तब्बल 526 कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला आहे. हा प्रकल्प दोन वर्षांत पूर्ण केला जाणार आहे. आळंदी येथील स्थानिक नागरिकांनी सांगितले की, गेल्या 15 ते 16 वर्षांपासून इंद्रायणी नदीची अशीच दयनीय अवस्था आहे. या संदर्भात त्यांनी प्रशासनाकडे अनेक वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केला आहे. मात्र सरकारकडून केवळ कागदोपत्री इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेची कामे सुरू असल्याचे सांगितले जाते.
advertisement
नदी स्वच्छतेच्या मार्गावर असल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात परिस्थिती पूर्णपणे उलट असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतून येणारे रसायनयुक्त सांडपाणी आणि मैलामिश्रित पाण्यामुळे नदीचे पात्र पांढऱ्या फेसाने ओसंडून वाहत आहे. डिसेंबर महिन्यात नदीत मोठ्या प्रमाणात मृत माशांचा खच पडल्याची घटना घडली होती. आता फेसाळलेल्या पाण्यामुळे प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडली आहे.
advertisement
ग्रामस्थांचं प्रशासनाकडे साकडं
आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेसाठी अवघ्या चार दिवसांत पुण्यातील रस्त्यांची कामे, तुंबलेली गटारे आणि इतर कामे पूर्ण केली जातात. मग इंद्रायणी नदी स्वच्छ करण्यासाठी नागरिक वर्षानुवर्षे मागणी करत असतानाही अजूनही ठोस कारवाई का होत नाही, असा संतप्त सवाल स्थानिक ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
काही मोजक्या दिवसांत मोठी कामे पूर्ण होऊ शकतात, तर इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेसाठी इतका विलंब का? असा थेट प्रश्न उपस्थित करत जाणूनबुजून सरकार या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष करत आहे का, अशी शंका नागरिकांनी व्यक्त केली. इंद्रायणी नदी ही केवळ नदी नसून भाविकांची आस्था, पर्यावरण आणि आरोग्याशी निगडित विषय असल्याचे सांगत तातडीने ठोस उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 08, 2026 6:07 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Indrayani River: अलंकापुरीची इंद्रायणी की ‘फेस’गंगा? Video पाहाल तर आळंदीकरांसारखंच बोलाल!




