“आम्ही जेव्हा मासिक पाळी व्यवस्थापनाबद्दलच्या कार्यशाळा जिल्हा परिषद शाळांतून घ्यायला सुरूवात केली. तेव्हा एकेक वेगवेगळे अनुभव येत गेले. मुळात ‘मासिक पाळी’ हा शब्दच उच्चारायची शिक्षकांचीही तयारी नसायची. ती काहीतरी गुप्त, सिक्रेट ठेवण्याची, काहीशी अस्वच्छ, अमंगल बाब आहे, असं अनेकदा स्टाफच्या देहबोलीतून दिसायचं. आणि शिक्षक मुलींना सांगताना म्हणायचे, ‘या मॅडम तुम्हांला शारीरिक स्वच्छतेबद्दल काही सांगणार आहेत.’ म्हणजे हे काही अंशी बरोबर. पण शारीरिक स्वच्छता कसली, तर पाळीतली शारीरिक स्वच्छता, पाळीविषयीची जनजागृती. तो शब्दच उच्चारायला लोक कचरत असतील, तर कशी होणार जनजागृती? हे उमगलं आणि कार्यशाळेचं नावच आम्ही ठेवलं- 'म' मासिक पाळीचा, 'P' for Periods”.
advertisement
आम्ही आत्तापर्यंत संपूर्ण परभणी जिल्हा , हिंगोली, लातूर, जालना, वाशीम आणि बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 250 जिल्हा परिषद व खाजगी अनुदानिक शाळांमधील 24 हजार पेक्षा अधिक किशोरवयीन मुलींचे मासिक पाळी विषयी समुपदेशन केलंय, एवढंच नाही तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील 11,000 पेक्षा अधिक किशोरवयीन मुलींना मोफत सॅनिटरी पॅडचे वाटपही केलंय. मुळात समाजाविषयी काहीतरी करण्याची कळकळ आहे, आणि त्यातूनच या उपक्रमांचा जन्म झालाय. स्वत:ची होमिओपॅथीची प्रॅक्टिस सांभाळून कसल्याही अनुदानाविना लोकसहभागातून हे कार्य सुरू आहे, हे विशेष. यासाठी आमच्या ग्रुप सदस्या पद्मा भालेराव, सरिता जिंतूरकर, ऋतुजा तापडिया, अनुराधा अमिलकंठवार, अंजली जोशी, विशाखा हेलसकर, क्षितिजा तापडिया यांची वेळोवेळी साथ लाभली आहे.
परभणीत स्थापन केलेल्या होमिओपॅथिक अकडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीजच्या उपक्रमातंर्गत, 'स्पर्श' या सॅनिटरी पॅड प्रकल्पाची सुरूवात IAS राहुल रेखावार यांच्या हस्ते काही वर्षांपूर्वी झाली. या उपक्रमाचाच एक भाग म्हणून लातूर जिल्ह्यातील हसेगाव इथल्या ‘सेवालय’मधील एचआयव्हीग्रस्त मुलींना सॅनिटरी पॅड बनवण्याचे प्रशिक्षण आणि स्वयंरोजगार मिळावा हा उद्देश होता. तिथं आसपासच्या अनेक गरजू मुलींनाही मोफत पॅड वाटपाचे काम या दाम्पत्याने केलं. पण नुसते मोफत सॅनिटरी पॅड वाटून काहीच होत नाहीए, हे त्यांच्या लवकरच लक्षात आलं. कारण मुळात मासिक पाळीबाबत ग्रामीण भागात असणारे गैरसमज आणि अंधश्रद्धा.
“ग्रामीण भागात काय अनेकदा शहरी भागातही पाळी म्हणजे, पाप काहीतरी अपवित्र, घाणेरडी गोष्ट असा समज असतो. पाळी आलेल्या बाईनं पुरूषाला शिवू नये, फेकलेलं पॅड सापानं ओलांडलं तर वंध्यत्व येतं, पाळी आल्यावर बाजूला बसायलाच हवं, मंदिरात तर मुळीच जाऊ नये, अश्या एक ना अनेक गैरसमजुती ऐकून डोकंच चक्रावलं, या सगळ्याबाबत काहीतरी करायलाच हवं हे जाणवत होतं.” “म्हणूनच या विषयावर ग्रामीण भागातील किशोरवयीन मुलींमध्ये मासिकपाळीबद्दल जनजागृती आणि समुपदेशनाचा आम्ही विचार करायला लागलो. त्यासाठी दिशा दाखवली ते आमचे मार्गदर्शक प्रा. शिवा आयथळ आणि सामाजिक कार्यकर्ते प्रा. जयंत देशपांडे सरांनी. त्यांच्या मार्गदर्शनातून आम्ही मासिक पाळी व्यवस्थापन कार्यशाळांचे आयोजन आधी परभणीतील ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमधील सातवी ते बारावीतील किशोरवयीन मुलींसाठी सुरू केले. याचं उद्घाटनच केलं ते 3 जानेवारी 2019 रोजी सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्ताने.”
या कार्यशाळेत मासिक पाळी म्हणजे काय, ती का येते, प्रजननाचे चक्र कसे असते, वाढत्या वयातील मुलींनी पोषत आहार विहार, भरपूर लोह आणि कॅल्शिअमयुक्त आहार घेणे का गरजेचे आहे? त्यासोबतच योग्य तो व्यायाम का गरजेचा? मासिक पाळीशी निगडित अंधश्रद्धा आणि कुप्रथा कश्या चुकीच्या आहेत, त्यांना बळी न पडता स्वत: विचार करायला शिकायला हवं, अश्या अनेक गोष्टी शिकवल्या जातात. शिवाय यात ‘हॅलो पीरियडस’ नावाची एक शॉर्ट फिल्म दाखवली जाते, अतिशय साध्यासोप्या मराठीत काही पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनही दाखवलं जातं आणि शेवटी 20 मार्कांची अगदी साध्या- सोप्या पाळीविषयक प्रश्नांची एक टेस्टही घेतली जाते, जेणेकरून मुलींना खरोखर हा विषय समजला आहे का, ते कळतं.
“हे प्रशिक्षण साध्या सोप्या भाषेत करणं, हे आमचं मुख्य ध्येय होतं. कुणालाही अवघड वाटणार नाही असं सहजपणे सांगायचं, त्यामागचं विज्ञान समजावून सांगायचं हे ध्येय होतं. त्यासाठी माझे पती डॉ. पवन चांडक यांनी सुरूवातीला, त्यांच्या वडिलांसमोर म्हणजे माझ्या सासऱ्यांसमोर हे प्रॅक्टिस सेशन घ्यायचं सुचवलं. त्यांच्यासमोर सहज न अवघडता बोलू शकले तर मुलींसमोर बोलणं, सहजच जमेल. हे अतिशय अवघड वाटणारं आव्हान मी पेललं. दुसरा मुद्दा होता मराठीचा. माझ्या माहेरी मारवाडी भाषा बोलली जात असल्याने माझी मराठी अतिशय अस्खलित नव्हती. शिवाय इथं तर ग्रामीण भागातील मुली, महिलांना कळेल अशी सोपी मराठी बोलायची होती, पण ते प्रयत्नानं मी साध्य केलं.” डॉ. आशा चांडक सांगत होत्या.
त्या पुढे म्हणतात, “ पाळीतल्या अंधश्रद्धा हा तर मोठाच विषय आहे. त्यासाठीच आम्ही सध्या आजी, आई आणि मुलगी अश्या एकाच कुटुंबातील स्त्रियांसाठीही कार्यशाळा सुरू केलीय. एक अंधश्रद्धा ही की, पाळी सुरू असलेल्या बाईने पापड केले/ पापडाला हात लावला तर ते लाल होतात, ही अंधश्रद्धा. यावर मी त्यांना लिज्जत पापडचे उदा. देते. लिज्जत पापड बनवणाऱ्या सगळ्या बायकाच आहेत, त्यांच्यातल्या कुणा ना कुणाची कधीतरी पाळी सुरू असणारच. त्याने पापड लाल होतात का कधी? पापड लाल झाले म्हणजे, पापडखार/ सोडा आणि मीठ यांचं प्रमाण काहीतरी बिघडून रासायनिक प्रक्रिया झाली, हे शास्त्रीय कारण आहे, त्यात पाळीचा संबंध नाही. तेच पाळीत वापरलेलं कापड सापानं ओलांडलं तर वंध्यत्व वगैरे, हे झूठ आहे, त्याला अनेक आरोग्यविषयक बाबी कारणीभूत असतात, सापाचा काय संबंध? मुळात घरातल्या ज्येष्ठ स्त्रियांसोबत ही सेशन्स घेतल्याने त्याही विचार करू लागतात, आणि मुलींवरचा दबाव थोडा तरी कमी होतो. आहाराबाबतीत लोहासाठी आधी मी खजूर, गूळ- शेंगदाणे, सुकामेवा खायचा सल्ला द्यायचे, पण या पालकांना ते अवघड आहे, कळल्यावर निदान लोखंडी तवा, भाजीत लोखंडी पळी वापरा हे सांगू लागले.”
याशिवाय 'पाळी: शाप की वरदान?' ‘माझी पहिली पाळी’ याविषयावरच्या निबंधस्पर्धाही त्यांनी घेतलेल्या आहेत. कार्यशाळेत पाळीच्या काळात सॅनिटरी पॅड किंवा सुती कापड कसे वापरावे, किती वेळाने बदलावे? त्याची योग्य विल्हेवाट कशी लावावी? मेन्स्ट्रुअल कप म्हणजे काय? ते पर्यावरणासाठी कसे चांगले, ही फक्त उदा. देऊन हे दाम्पत्य थांबत नाही, तर यांच्या घरी राखीपौर्णिमा– भाऊबीजेला पतीच्या बहिणींना चक्क मेन्स्ट्रुअल कप भेट मिळालाय. ही गोष्ट टाळण्याची, लाजण्याची नाही तर मोकळेपणे बोलण्याची आहे, हे त्यांना पक्कं उमगलंय.
- डॉ. आशा पवन चांडक
लेखक मासिक पाळी समुपदेशन तज्ज्ञ असून परभणी येथे त्यांचे होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज सेंटर आहे.