भुजबळांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी स्वत: प्रतिक्रिया दिली आहे. छगन भुजबळ यांच्या वक्तव्यामागची नेमकी त्यांची भूमिका काय आहे, हे मी त्यांना विचारेन, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे.
अजित पवार काय म्हणाले?
छगन भुजबळांच्या वक्तव्याबाबत विचारलं असता अजित पवार म्हणाले, "मला त्यांच्या वक्तव्याबद्दल फारसं माहीत नाही. ते (छगन भुजबळ) उद्या किंवा संध्याकाळी परत येतील. तेव्हा मी त्यांना विचारेन. त्यांनी जो गौप्यस्फोट केला आहे. त्यामागची त्यांची भूमिका काय आहे, त्यांच्याकडे अधिकची काय माहिती आहे, याबद्दल मी त्यांना विचारेन."
advertisement
छगन भुजबळांनी नेमकं काय म्हटलं?
नागपुरात पार पडलेल्या समता परिषदेच्या कार्यक्रमात छगन भुजबळ म्हणाले की, "अंतरवाली सराटीत 83 पोलिसांवर दगडफेक झाली. त्याचा प्लॅन आदल्या रात्री ठरला. त्यावेळेस पवार साहेबांचा एक आमदार त्या बैठकीत सहभागी होता. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना वस्तुस्थिती माहीत असतानाही, शरद पवार त्या ठिकाणी गेले."
खरं तर, अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे यांचे आंदोलन सुरू असताना पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला होता. त्यामध्ये अनेक महिला तसेच लहान मुलेही जखमी झाले होते. त्यानंतर उपस्थित जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. काही वाहनं जाळली. त्याच घटनेवरून छगन भुजबळांनी थेट पवारांवर निशाणा साधला.