अमरावती - सध्या नवरात्रोत्सव सुरू आहे. सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. आज आपण अमरावती जिल्ह्यातील पिंगळा देवीबाबत जाणून घेणार आहोत. दिवसभरात ही देवी 3 रुपांनी भक्तांना दर्शन देते असे सांगितले जाते. याचबाबत लोकल18 च्या टीमने नवरात्रीच्या निमित्ताने घेतलेला हा विशेष आढावा.
अमरावतीवरून 31 किलोमीटर अंतरावर गोराळा हे गाव आहे. त्या गावापासून 2 किलोमीटर अंतरावर आतमध्ये गडावर पिंगळादेवी स्थित आहे. गेले अनेक वर्षापासून येथे स्थित असलेली ही पिंगळा माता स्वयंभू आहे आणि दिवसभरात देवी 3 रूपांमध्ये भक्तांना दर्शन देते, असे येथील नागरिक सांगतात.
advertisement
पिंगळादेवी संस्थान येथील पुजारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, गडावर स्थित असलेली पिंगळा देवी ही दिवस भरात 3 रुपात भक्तांना दर्शन देते. सकाळी बालिका, दुपारी कुमारिका आणि रात्री आईचे रुप घेते. ही देवी भक्तांना पावणारी आहे. त्याचबरोबर येथे अनेक लोक नवस करतात आणि नवरात्रीमध्ये नवस फेडण्यासाठी येतात. या देवीची उत्पत्ती ही विहिरीवर झालेली आहे. या देवीचे शिर फक्त बाहेर आले आहे. बाकी देवी आतमध्ये आहे. देवीच्या ओट्याखाली विहीर आहे.
आपट्याची पानं आहेत फारच गुणकारी, आयुर्वेदिक फायदेही आहेत खूपच, VIDEO
या ठिकाणी नवरात्रीमध्ये येथे विशेष खापरी पूजा केली जाते. ही खापरी पूजा इतर कुठेही केली जात नाही. खापरी पूजेचा उत्सव हा सप्तमी आणि अष्टमीच्या मध्यरात्री असते. ही पूजा गेले अनेक वर्षापासून चालत आलेली आहे. खापरी म्हणजे मातीच्या भांड्यामध्ये धूनी पेटवून ती पुजाऱ्याच्या हाताने फिरवली जाते, अशी माहिती पुज्याऱ्यांनी दिली.
दरवर्षी 20 ते 30 लाखांपर्यंत लोक नवरात्रीमध्ये या मंदिरामध्ये येतात. या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीला महाप्रसाद दिला जातो. त्याचे कूपन हे 20 रुपयांमध्ये आहे. बाराही महिने हा महाप्रसाद भक्तांसाठी येथे बनवला जातो. त्याचबरोबर प्रत्येकाला धर्माचे शिक्षण मिळावे यासाठी येथे सोय उपलब्ध करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती पिंगळादेवी संस्थानचे अध्यक्ष विनीत पाखोडे यांनी लोकल18 शी बोलताना दिली.
सूचना - ही माहिती मंदिरांचे पुजारी यांनी दिलेल्या माहितीवर आधारित आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. याबाबत लोकल18 कोणताही दावा करत नाही.