अमरावती - विदर्भाची कुलस्वामिनी असलेल्या अमरावतीच्या अंबादेवी आणि एकविरा देवी मंदिरात शारदीय नवरात्र उत्सव सुरू झाला आहे. नवरात्रीमध्ये अंबादेवी मंदिरात मोठी यात्रा असते. त्याचबरोबर हजारोंच्या संख्येने भाविक येथे दर्शनासाठी येतात. अमरावती येथील कुलस्वामिनी आई अंबाबाई नवसाला पावते, अशी मान्यता आहे. त्यामुळे अनेक भाविक याठिकाणी नवस फेडण्यासाठी आणि ओटी भरण्यासाठी येतात. पण अमरावतीची ओळख असलेल्या या मंदिराचा इतिहास नेमका काय आहे, हे आज आपण जाणून घेऊयात.
advertisement
अंबादेवी संस्थानच्या कोषाध्यक्ष मिना पाठक यांनी याबाबत माहिती दिली. लोकल18 शी बोलतांना त्यांनी सांगितले की, या मंदिरातील अंबाबाईची मूर्ती ही स्वयंभू आहे. त्याचबरोबर ही देवी नवसाला सुद्धा पावते. शारदीय नवरात्रात इथे मोठी यात्रा असते. हजारोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात.
नवरात्राचे 9 दिवस इथे विविध कार्यक्रम असतात. भगवान श्रीकृष्णाने रुक्मिणीशी याच ठिकाणी विवाह केला होता. इथून ते रुक्मिणी रुख्मिणीचे माहेर कौंडिण्यपूर पर्यंत एक भुयार आहे. त्यातूनच भगवान श्रीकृष्णाने रुख्मिणीला आणले होते आणि अमरावतीमध्ये अंबादेवीच्या साक्षीने विवाह केला होता, असा या मंदिराचा इतिहास आहे, असे त्या म्हणाल्या.
नवरात्रौत्सवात देवीला द्या मालवणी शेवयांच्या खीरचा नैवेद्य, अशी आहे सोपी रेसिपी, VIDEO
त्याचबरोबर अंबादेवी ही स्वयंभू आहे आणि एकविरा देवी ही रामदास स्वामीच्या बाणाने प्रकट झालेली आहे, असेही म्हटले जाते. खूप वर्षांआधी, अंबा नदीला पूर आला होता. त्याने अंबादेवीच्या दर्शनाला जाता येत नव्हते. तेव्हा जनार्दन स्वामी यांनी असे ठरवले की, जोपर्यंत देवीचे दर्शन घेत नाही तोपर्यंत पाणी सुद्धा घेणार नाही. त्यावेळी त्यांनी एकविरा देवी आता जिथे स्थित आहे, तिथे बाण मारला आणि देवी प्रकट झाली. त्यामुळे एकविरा देवी ही बाणावरची आहे, असे म्हटले जाते, अशी माहितीही मीना पाठक यांनी दिली. तर मग असा या मंदिराचा इतिहास आहे.
सूचना - ही माहिती मंदिराशी संबंधितांनी दिली आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. लोकल18 याबाबत कुठलाही दावा करत नाही.