अपघातानंतर चारचाकीचा चालक घटनास्थळावरून तत्काळ फरार झाला आहे. विशेष म्हणजे, ज्या गाडीने अतुल घरत यांच्या दुचाकीला धडक दिली, त्या गाडीवर 'आण्णा' असा मजकूर लिहिलेला असून, गाडीच्या आतमध्ये पोलिसांची वर्दी आढळल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे या अपघातामागे घातपात असल्याचा संशय सोशल मीडियातून व्यक्त केला जात आहे, ज्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
advertisement
अपघात की घातपात?
बीड तालुक्यातील महाजनवाडी येथील रहिवासी असलेले अतुल घरत हे पाटोदा येथून आपल्या गावी परत येत असताना दासखेड फाटा येथे त्यांच्या दुचाकीला भरधाव चारचाकीने जोराची धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, अतुल घरत यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघात घडवून चालक फरार झाल्यानंतर स्थानिक लोकांनी अपघातस्थळी धाव घेतली. यावेळी तपासणी केली असता अपघातग्रस्त चारचाकीवर 'आण्णा' असं लिहिलेलं आढळलं आहे. अतुल घरत हे मनोज जरांगे यांचे निष्ठावान समर्थक असल्याने, हा अपघात नसून जाणूनबुजून केलेला घातपात असावा, असा संशय आता व्यक्त होत आहे. या संशयाची सुई वाल्मीक आण्णा कराड यांच्या दिशेनं जात आहे. कारण मागच्या काही काळात मनोज जरांगे यांनी संतोष देशमुख खून प्रकरणावरून वाल्मीक कराडला चांगलंच घेरलं होतं. याच कारणातून हा घातपात घडवलेला असू शकतो, अशी चर्चा सध्या सुरू आहे. मात्र या अपघाताशी वाल्मीक कराड याचं थेट कनेक्शन असल्याचा कोणताही पुरावा समोर आला नाही.
पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून, अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र, या प्रकरणातील सत्य काय आहे? हा अपघात होता की घातपात, हे फरार चालकाला अटक केल्यानंतरच स्पष्ट होऊ शकेल.
