आम्हाला न्याय हवाय!
आमची मुलगी अजुनही धक्क्यातच आहे. काय झालंय? काय होतंय? हे तिच्या कळण्यापलीकडचं आहे. आमच्यासाठी सुद्धा ही घटना खूपच वेदनादायी आहे. 13 ऑगस्टपर्यंत आम्हाला आमच्या मुलीसोबत असं काही घडलंय, याची पुसटशीही कल्पना नव्हती. आमची हसती खेळती मुलगी अचानक शाळेत जायला नाही म्हणू लागली. त्याच दरम्यान आमच्या लक्षात आलं की ती नीट चालू शकत नाहीये. तिच्या बाबतीतली आणखी एक अबनॉर्मल गोष्ट आम्ही ऑब्जर्व्ह केली, आमची मुलगी शूला जायला नाही म्हणू लागली होती. आम्हाला वाटलं की तिला कदाचित युरीन इनफेक्शन झालं असावं.
advertisement
याच वेळी आम्हाला शाळेतल्या आणखी एका मुलीच्या वडिलांनी सांगितलं की त्यांची मुलगी त्यांना सांगत होती की शाळेतल्या एका दादाने तिच्यासोबत काहीतरी चुकीचं केलं आहे..मुलीनं असं सांगितल्यावर त्यांनी त्यांच्या मुलीची वैद्यकीय चाचणी करण्याचं ठरवलं होतं. हे ऐकून आम्हीही अलर्ट झालो. कारण आमची मुलगीही शाळेत जायला घाबरत होती आणि शूला जायलाही टाळाटाळ करत होती. मग आम्ही आमच्या मुलीचीही मेडिकल टेस्ट करण्याचा निर्णय घेतला. टेस्टचा रिझल्ट पॉझिटिव्ह आला. हे सगळं पचवणं आमच्यासाठी खूपच धक्कादायक होतं, वेदनादायी होतं.
पण या धक्क्यातून सावरुन आम्ही हिंमत गोळा केली आणि पोलीसांत जाण्याचा निर्णय घेतला. 16 ऑगस्टच्या दिवशी आम्ही प्राथमिक मेडिकल रिपोर्टसोबत पोलीस स्टेशनला पोहोचलो. पण 12 तास आमची कुणीही दखल घेतली नाही. आम्ही वेळोवेळी विनंती करत राहिलो की आमचं ऐकून तरी घ्या, पण पोलिसांकडून आम्हाला खूप उद्धट आणि अरेरावीची उत्तरं मिळाली. शेवटी आम्ही स्थानिक राजकीय नेत्यांकडे गेलो आणि मग त्यांच्या हस्तक्षेपानंतर आमची तक्रार नोंदवली गेली.
एफआयआर दाखल झाल्यावर आम्हाला पुन्हा सरकारी रुग्णालयात मुलीची टेस्ट करण्यास सांगितलं. दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजताची वेळ देली. पण तिथेही पोलिसांच्या दिरंगाईचा आम्हाला सामना करावा लागला. आम्ही पावणे नऊलाच तिथे पोहोचूनही पोलिस मात्र 11 वाजता आले.
आम्हाला शंका आहे, की शाळेतल्या आणखी काही मुलींसोबत असा प्रकार घडलेला असू शकतो. पण भितीपोटी लोक पुढे यायला घाबरत असावेत. काही दिवसांपूर्वी पालकांनी आरोपी अक्षय शिंदेच्या चुकीच्या वागणूकीबद्दल वर्गशिक्षकांकडे तक्रारही केली होती, पण वर्गशिक्षिकेने लक्षही दिलं नाही. वर्गातल्या मुलींना शू करुन येण्यासाठी 15 मिनीटांचा वेळ कसा लागतो असा साधा प्रश्नही वर्गशिक्षिकेला का पडू नये याचं आम्हाला खूप नवल वाटतंय. आणखी एक गोष्ट म्हणजे वर्गापासून बाथरुम खूप लांब असल्याने तिथपर्यंत जाण्यासाठी मुलांना मदतीची गरज लागणारच आहे.
या घटनेनंतर आम्ही शाळेकडे त्या दिवसांच्या सीसीटिव्ही फुटेजची मागणीही केली. पण शाळेने फुटेज द्यायला नकार दिला. गेल्या 15 दिवसांपासून सीसीटिव्ही बंद असल्याचं आम्हाला सांगितलं. शाळा व्यवस्थापनाने पुराव्यांसोबत छेडाछाड केली असल्याचाही आम्हाला संशय वाटतो. पण आमच्या मुलींना न्याय मिळावा हीच आमची अपेक्षा आहे.