बदलापूर : बदलापूरच्या शाळेत अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या आरोपी अक्षय शिंदेचं घर स्थानिकांनी फोडलं आहे. तसंच आरोपी अक्षय शिंदेच्या लग्नाबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. अक्षय शिंदेची तीन लग्न झाली आहेत, पण त्या तिघीही अक्षयसोबत राहत नाहीत. दरम्यान या प्रकरणी आरोपी अक्षय शिंदेने पोलीस तपासात गुन्हा कबूल केला आहे. आरोपी अक्षय शिंदेचा जबाब व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला आहे. हा जबाब मोठा पुरावा म्हणून पोलीस कोर्टात सादर करणार आहेत.
advertisement
बदलापूरच्या शाळेत काय झालं?
बदलापूरच्या शाळेत 13 ऑगस्टच्या दिवशी दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाले. अत्याचार करणारा होता याच शाळेचा सफाई कर्मचारी अक्षय शिंदे. या दोन्ही मुलींना अक्षय लघुशंकेसाठी घेऊन गेला होता आणि तेव्हाच त्याने या दोन लहानग्यांसोबत हे घृणास्पद कृत्य केलं. दोन दिवसांनी यातल्याच एका मुलीनं आपल्या पालकांना काहीतरी चुकीचं झाल्याचं सांगितलं. पालकांनी थेट धाव घेतली ती शाळा प्रशासनाकडे. घडलेल्या घटनेचा शाळेला जाब विचारला, पण शाळा प्रशासनाने मात्र कोणतीही दाद दिली नाही. तसंच शाळेचे सीसीटीव्ही गेल्या 15 दिवसांपासून बंद असल्याचं सांगितलं.
12 तास गुन्हा दाखल नाही
लहान मुलीच्या वैद्यकीय तपासणीच्या रिपोर्टमध्ये या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याचं सिद्ध झालं. 17 ऑगस्टला घटनेची तक्रार देण्यासाठी पालक पोलीस स्टेशनला गेले, पण इथेही त्यांना सामना करावा लागला आपल्या व्यवस्थेच्या ढिम्मपणाचा आणि बेफिकीरीचा. बदलापूर पूर्व पोलीस स्थानकात वरिष्ठ पोलिस निरीक्षक शुभदा शितोळे ड्युटीवर होत्या. पालक दुपारी 12 वाजता तक्रार देण्यासाठी पोहोचले. पण या पालकांना आपल्या लहानग्यांवर झालेल्या अत्याचाराविरोधात तक्रार देण्यासाठी शुभदा शितोळेंनी साडेबारा तास ताटकळत ठेवलं. मध्यरात्री साडेबारा वाजता गुन्हा दाखल झाला, त्यानंतर आरोपी अक्षय शिंदेला अटक झाली. गुन्हा दाखल करण्यात दिरंगाई केल्या प्रकरणी शुभदा शितोळे यांची पदावरुन उचलबांगडी झाली आहे.