महाराजांची बदनामी करण्यासाठी जर असं कोणी मुद्दाम करत असेल तर महाराष्ट्रात हे सहन केलं जाणार नाही. मुख्यमंत्री सायबर सेलला पुन्हा आदेश देतील. छत्रपती शिवाजी महाराज,संभाजी महाराज यांच्याबद्दल मानहानीकरक बोलले जात असेल किंवा कोणी पसरवत असेल तर राज्य सरकार त्याच्यावर कठोर कारवाई करेल असा इशारा मंत्री शंभूराज देसाई यांनी दिला आहे.
advertisement
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश
विकिपीडियावरील छत्रपती संभाजी महाराजांच्या आक्षेपार्ह मजकूराबाबत बोलाताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराजांबाबत विकिपीडियावर लिहिलेल्या वादग्रस्त गोष्टींचा आम्ही निषेध करतो. राज्य सरकारने सायबर विभागाचे आयजी यशस्वी यादव यांच्याशी संपर्क केला आहे. त्यांनी विकिपीडियाशी बोलून संभाजी महाराजांबद्दलची वादग्रस्त माहिती हटवून योग्य माहिती प्रसारित करण्याचे आदेश दिले आहेत.
विकिपीडिया भारतातून चालवले जात नाही : मुख्यमंत्री
सायबरच्या अधिकाऱ्यांना मी विकिपीडियावरील आक्षेपार्ह लिखाणाबद्दल माहिती दिली आहे. त्यांना विकिपीडियाशी संपर्क साधून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. विकिपीडिया भारतातून चालवले जात नाही. त्यांचे स्वतःचे काही नियम आहेत. त्यामुळे ऐतिहासिक गोष्टींचा विपर्यास करण्याऐवजी त्यासंदर्भात काही नियम तयार करा, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
छावा चित्रपट टॅक्स फ्री?
छत्रपती संभाजी महाराज यांचे शौर्य, वीरता आणि विद्धवता प्रचंड होती. परंतु इतिहासाने त्यांच्यावर अन्याय केला. आता त्यांच्यावर अतिशय चांगला चित्रपट आला आहे. ऐतिहासिक असा हा चित्रपट तयार झाला आहे. हा चित्रपट करमुक्त करण्याची मागणी होत आहे. परंतु महाराष्ट्रात करमणूक करच नाही. इतर राज्य जेव्हा एखादा चित्रपट टॅक्स फ्री करतात तेव्हा ते करमणूक कर माफ करतात. परंतु महाराष्ट्राने 2017 सालीच करमणूक कर रद्द केला. त्यामुळे आपल्याकडे करमणूक कर नाही.