शरद पवारांचे एकीकाकळचे खंदे समर्थक. ज्या भुजबळांनी मंडल आयोगानंतर बाळासाहेबांची साथ सोडून शरद पवारांचा हात धरला. पवारांनीही पक्षात वेळोवेळी पक्षातील महत्वाच्या पदांसाठी ज्यांना संधी दिली, त्याच छगन भुजबळांनी आता थेटपणे पवारांविरोधात दंड थोपटल्याचं पाहायला मिळतंय आणि याचं कारण ठरलं, मराठा आरक्षण... मागील दोन वर्षांपासून मनोज जरांगेंच्या आंदोलनातून सातत्यानं ओबीसी नेते आणि त्यातही छगन भुजबळांना लक्ष्य केलं जातंय. याच मनोज जरांगेंच्या मुद्द्यावरुन छगन भुजबळांनी शरद पवारांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय. कारण, पवारांमुळे जरांगे मोठे झाल्याचा आरोप भुजबळांना केलाय.
advertisement
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी नेते आक्रमक झाले असतानाच, भुजबळ आणि शरद पवारांमध्ये यावरुन खणाखणी सुरू झाल्याचं दिसतंय. मराठा-ओबीसींमधील कटुता कमी व्हावी म्हणून मुख्यमंत्री, भुजबळ उपसमिती अध्यक्षांनी सुसंवाद साधावा हा मुद्दा पवारांनी उपस्थित केलेला. यावर भुजबळांनी जोरदार पलटवार केलाय. त्याचवेळी मराठा उपसमितीत एकाच समितीचे सदस्य असल्याचंही पवार म्हणाले. यावर भुजबळांनी जोरदार पलटवार केला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शरद पवार हे सरकारचे मार्गदर्शक होते. मग त्यावेळी मराठा आरक्षण उपसमितीमध्ये फक्त मराठा नेतेच कसे होते? असा सवाल भुजबळ यांनी केला.
भुजबळांनी थेटपणे शरद पवारांविरोधात रणशिंग फुंकल्यानंतर सुप्रिया सुळे आणि पवारांचे नेते समोर आले. पवारांच्या राष्ट्रवादीनं भुजबळांना जुन्या दिवसांची आठवण करून देत, त्यांचे आरोप फेटाळून लावले.
पवारांच्या राष्ट्रवादीकडून भुजबळांचे आरोप फेटाळत इतिहासाची उजळणी केली जातेय. पण, असं असलं तरी भुजबळ त्यांची तलवार म्यान करायला तयार नाहीयेत. मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणाच्या मागणीवरुन महाराष्ट्रात रणकंदण सुरू असतानाच, भुजबळांनी आता पवारांवर तोफ डागलीय. त्यामुळं आरक्षणाच्या वादात भुजबळ विरुद्ध पवार असा राजकीय संघर्ष तापण्याची चिन्हं आहेत. यात संघर्षात पुढे काय घडतं? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
