मालेगाव डोंगराळे इथं ३ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिचा निर्घृणपणे खून केल्याच्या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. आज गुरुवारी मनोज जरांगे पाटील आणि मंत्री नरहरी झिरवळ यांनी पीडित कुटूबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केलं. पीडित मुलीला न्याय देण्यासाठी आरोपीला तातडीने फाशीची शिक्षा देण्याची जरागे पाटील यांनी मागणी केली अन्यथा एकाही मंत्र्यांला राज्यात फिरू देणार नाही, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.
advertisement
'मुख्यमंत्री, महोदय दोन महिन्याच्या आत कायदा करा आणि आरोपीला फाशी द्या. नाहीतर त्याचा एन्काऊंटर करा. लाडकी लेक म्हणतात, लाडकी बहीण म्हणतात तर त्यांना न्याय द्या. न्याय देता येत नसेल तर तुमचे तोंड काळे करा. दोन महिन्याच्या आत न्याय न दिल्यास संपूर्ण महाराष्ट्र रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.
कायद्यात बदल करा ; काहीही करा पण न्याय द्या' अशी मागणी जरांगेंनी केली.
'येत्या मंगळवारी कॅबिनेट मीटिंगमध्ये कायदा दुरुस्ती करा. बाल लैंगिक सुधारणा कायद्यात दुरुस्ती करा.
मृत मुलीच्या नावाने कायदा करा. वकील म्हणून उज्ज्वल निकमांची नियुक्ती करा. महिन्याच्या आत चार्जशीट दाखल करा आणि त्या आरोपीला फाशीची शिक्षा द्या.. न्याय न दिल्यास तुम्ही निर्दयी मुख्यमंत्री असाल असे आम्ही समजू, असंही जरांगे म्हणाले.
...नाहीतर अकराव्या दिवशी रस्त्यावर उतरणार
'मालेगाव, नाशिकसह संपूर्ण राज्य बंद करणार आणि न्याय मिळवून देणार, पीडित कुटुंबियांनी दहा दिवसांची मुदत सरकारला दिली आहे. अकराव्या दिवशी जर मला बोलावलं तर त्या कुटुंबासाठी मी केव्हाही रस्त्यावर उतरेल. कुटुंबियांशी चर्चा करतांना काही मागण्या आम्ही कागदावर नोट केल्या आहे. त्या सर्व मुख्यमंत्र्यांकडे पाठवू आणि आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, असा इशाराही पाटील यांनी सरकारला दिला.
