ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर आता याचे राज्यभर पडसाद उमटत आहे. सोशल मीडियावर प्रशांत कोरटकर यांच्याविरोधात टीकेचा भडीमार केला जात आहे. आज सकाळपासून नागपूरमध्ये मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी कोरटकर यांच्या घराबाहेर गर्दी केली आहे. त्यांनी हातात काळे झेंडे घेत जोरदार घोषणाबाजी केली आहे. यावेळी काही कार्यकर्त्यांनी प्रशांत कोरटकर यांच्या घरात घुसण्याचा देखील प्रयत्न केला.
advertisement
या सगळ्या घडामोडीनंतर परिसरात तणाव निर्माण झाला आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून त्यांनी आंदोलनकर्त्यांना नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. सुदैवाची बाब म्हणजे प्रशांत कोरटकर सध्या आपल्या घरी नाहीयेत. हे प्रकरण समोर आल्यानंतर ते आपल्या कुटुंबासह अज्ञात स्थळी गेले आहेत. कालपासून त्यांच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
दुसरीकडे, प्रशांत कोरटकर यांना अटक करण्यासाठी कोल्हापूर पोलिसांचं एक पथक मंगळवारी रात्रीच नागपूरला रवाना झालं आहे. आज प्रशांत कोरटकर यांना ताब्यात घेण्याची शक्यता आहे. उपनिरीक्षक दर्जाचे अधिकाऱ्यांसह कोल्हापूर पोलिसांचे पथक नागपूरला रवाना झालं आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या प्रकरणी प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे. जुना राजवाडा पोलीस ठाण्यात प्रशांत कोरटकरांवर गुन्हा दाखल झाला आहे. कोरटकर याने छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजीराजे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करत सावंत यांना शिवीगाळ केली होती. ‘तुला घरात येऊन मारेल, हा फायनल कॉल आहे’ असं म्हणत सावंत यांना धमकी दिली होती. एवढंच नाहीतर छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजीराजे यांच्याबद्दल कोरटकर याने अत्यंत खालच्या शब्दांत भाष्य केलं होतं. या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.