मुंबई : लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महायुतीला धक्का बसला आहे. महायुतीला 48 पैकी फक्त 18 जागांवर विजय मिळवता आला तर महाविकासआघाडीने 29 जागा जिंकत घवघवीत यश मिळवलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या या निकालानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय उलटफेर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या अजित पवारांसोबत असलेले 10 ते 12 आमदार पुन्हा एकदा शरद पवारांसोबत यायची शक्यता आहे.
advertisement
अजित पवारांसोबत असलेल्या 10 ते 12 आमदारांनी सुप्रिया सुळे यांना अभिनंदनाचा संदेश दिला. या संदेशाच्या मार्फत पक्ष वापसीसाठी या आमदारांकडून प्रयत्न केला जात आहे. 10 आमदार परतीसाठी संपर्क करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त एका जागेवर यश मिळालं. रायगडमधून सुनिल तटकरे यांचा विजय झाला तर उरलेल्या तीनही जागांवर राष्ट्रवादीला पराभवाचा सामना करावा लागला. बारामतीच्या हाय व्होल्टेज लढतीमध्ये सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने महाराष्ट्रात 10 जागा लढवून 7 जागांवर विजय मिळवला.
महाराष्ट्रातले निकाल
महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीच्या निकालात (Maharashtra Loksabha Result) काँग्रेस हा सगळ्यात मोठा पक्ष ठरला आहे. काँग्रेसने 13, भाजपने 10, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने 9, शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 7, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने 7 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एका जागेवर विजय मिळवला आहे.