मालेगावच्या डोंगराळे बालिका अत्याचार आणि खून प्रकरण नागपूर अधिवेशनात पोहचला असून नांदगावंचे शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी लक्ष वेधीच्या माध्यमातून आवाज उठवत खटला फास्टट्रक कोर्टात चालवून आरोपीला एक महिन्यात फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. आमदार कांदे हा प्रश्न मांडताना सुहास कांदे चांगलेच आक्रमक झाले होते.
राज्यात कायद्याची भीती राहिली नाही का? कांदेंचा संतप्त सवाल
advertisement
सुहास कांदे म्हणाले, मी मुलीचा बाप आहे. इथे प्रत्येक जण मुलीचा बाप आहे. आम्हाला मालेगाव प्रकरणी उत्तर हवे आहे. मालेगावच्या डोंगराळे गावात तीन वर्षाच्या चिमुरडीवर शेखर उर्फ विजय खैरनार या नराधमाने अत्याचार करून तिचा खून केला. खून केल्यानंतर तिला झाडा-झुडपात फेकून दिलं. ती बेपत्ता आहे म्हणून पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला. त्यानंतर हा नराधम पोलिसांसोबत त्या मुलीला शोधायला फिरत होता. त्या तीन वर्षाच्या मुलीचा सापडल्यानंतर पोलिसांनी ताबडतोब त्याच दिवशी त्या नराधमाला अटक केली. अटक केल्यानंतर मी आणि माझी पत्नी चिमूरडीच्या कुटुंबाला भेटायला गेलो. तेव्हा आम्हाला कळले की, त्या चिमुरडीची आई फक्त 23 वर्षांची आहे. तिने आत्तापर्यंत तीन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ते लोक जगत आहेत. इथे बसलेल्या प्रत्येकाला बहीण किंवा मुलगी असेल. तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार करायचा तिचा खून करायचा झाडा-झुडपात फेकून द्यायचे आणि ताठ मानेने त्या गावात पोलिसांसोबत फिरायचे. या राज्यात कायद्याची भीती राहिली नाही का?
आरोपीला फाशीची शिक्षा देण्यासाठी सरकार प्रयत्न करणार : एकनाथ शिंदे
आमदार कांदे यांच्या लक्षवेधीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर देत अलीकडच्या काळात राज्यात लहान मुलीवर बलात्कार आणि खून करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याची कबुली दिली. मालेगावच्या डोंगराळे येथील घटना अतिशय गंभीर असून मुख्यमंत्री आणि आम्ही बसून खटला फास्टट्रॅक मध्ये चालवून आरोपीला फाशीची शिक्षा देण्यासाठी सरकार प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
