जालन्यात वाळू माफिया आणि अट्टल गुन्हेगारांच्या विरोधात प्रशासन ॲक्शन मोडवर आलंय. वाळू प्रकरणासह इतर गुन्ह्यातील नऊ आरोपींना जालनासह बीड, परभणी आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलंय. या नऊ तडीपार आरोपींमध्ये मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मेहुण्याचंही नाव आल्यानं खळबळ माजलीय. विलास खेडकर असं जरांगेंच्या मेहुण्याचे नाव असून त्याच्यावर देखील तडीपारीची कारवाई करण्यात आलीय..या कारवाईनंतर जरांगेंनी जालन्यातील संबंधित अधिकाऱ्यांवर निशाणा साधत धमकीच देवून टाकली. पण, जरांगेंच्या ज्या मेहुण्यावर ही कारवाई झालीय, त्याची पार्श्वभूमी वादग्रस्त असल्याचं समोर येतंय.
advertisement
कोण आहे विलास खेडकर?
- जरांगेच्या मेहुण्याचे पूर्ण नाव विलास हरिभाई खेडकर असे आहे.
- विलास खेडकरवर 2021 मध्ये अवैध वाळू वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.
- 2023 मध्ये जालन्यातील शहागड इथे बस जाळल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आलेला
- 2023 मध्ये गोदावरी नदीतून 4 लाख 81 हजार रुपयांची वाळू चोरी प्रकरणी गुन्हा दाखल आहे
- 2023 मध्ये गोदावरी नदीतून 500 ब्रास वाळू चोरीप्रकरणातही त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला
- अशा विविध गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय न्यायदंडाधिकाऱ्यांनी विलास खेडकरवर कडक कारवाई केली
- त्याअंतर्गत आता जालना, बीड, परभणीतून 6 महिन्यांसाठी विलास खेडकरवर तडीपारीची कारवाई झाली
मेहुण्यासह 6 आंदोलकांवर तडीपारची कारवाई
ज्या 9 जणांवर तडीपारीची कारवाई झाली आहे, त्यातील तब्बल सहा जण हे मनोज जरांगे यांच्या आंदोलनामध्ये सक्रिय होते.. विशेष म्हणजे शनिवारीच जरांगेंनी सरकारविरोधात साखळी उपोषणाचा इशारा दिला होता. हा इशारा दिल्याच्या दुसऱ्याच दिवशी अंबडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या मेहुण्यासह 6 आंदोलकांवर तडीपार केलंय. त्यामुळंच आता जरांगेंनी या कारवाईवरुन अधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या आडून सरकारला लक्ष्य केल्याचं दिसतंय.. पण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मात्र ही कारवाई जरांगेंच्या मेहुणे म्हणून नाही तर दाखल गुन्ह्यांच्या आधारावर झाल्याचं स्पष्ट केलंय..