धनंजय मुंडे यांनी आपल्या हत्येचा कट रचला त्यांनी अडीच कोटींची सुपारी दिल्याचा आरोप जरांगे यांनी केला होता. एका बड्या राजकीय नेत्यावर अशाप्रकारे जरांगे यांनी आरोप केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलिसांनी आधीच अमोल खुणे आणि दादा गरुड नावाच्या दोन आरोपींना अटक केली होती. या प्रकरणात आता तिसरी अटक करण्यात आली आहे.
advertisement
मनोज जरांगे यांच्या हत्येचा कट रचल्या प्रकरणी तिसरा आरोपी कांचन साळवीला अटक केली आहे. त्याला बीडमधून बेड्या ठोकल्या आहेत. दादा गरुड आणि अमोल खुणे यांच्याशी कांचन साळवी नावाच्या व्यक्तीचा सबंध असल्याचा आणि तो धनंजय मुंडे यांचा PA असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला होता. दरम्यान साळवी याला अटक केल्यानं आता या प्रकरणात साळवी पोलिसांकडे काय खुलासे करतो? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
मनोज जरांगेंनी काय आरोप केले होते?
धनंजय मुंडेंवर आरोप करताना जरांगे म्हणाले की, बीडचा कांचन नावाचा माणूस आहे. तो धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता किंवा पीए आहे. धनंजय मुंडे यांनी माझ्याविरोधात षडयंत्र रचण्याचं काम केलं आहे. कांचन नावाच्या माणासाने दोन्ही आरोपींना हाताशी धरलं. या आरोपींना मला मारायचं सांगितलं असेल, ते तपासातून समोर येईल. मात्र कांचनने या पोरांना परळीला नेलं. तेव्हा रेस्ट हाऊसमध्ये एक मोठी बैठक सुरू होती, हा आलेला समजलं की धनंजय मुंडेंनी बैठक सोडली आणि २० मिनिटात इकडे आले. तिथे एक आरोपी नेला होता. तिथे दुसरा आधीपासून होता.
इकडे आल्यानंतर त्यांचा दोन कोटींमध्ये सौदा झाला. त्यात ५० लाख अधिक देण्याचं ठरलं. याआधीही त्यांनी यासाठी पाच ते सहा कोटी रुपये नासवले आहेत. इथून घातपाताचा प्लॅन सुरू झाला. धनंजय मुंडे प्रत्यक्षात या दोन आरोपींना भेटला आहे. त्यांनीच हे करायला सांगितलं आहे. हेही आरोपींना माहीत आहे. याचा सखोल तपास होणं गरजेचं आहे, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.
