तीन दिवसांपूर्वी १५ नोव्हेंबर रोजी माणुसकीला काळीमा फासणारी घटना नाशिक जिल्ह्यातील मालेगाव इथं डोंगराळे गावात घडली होती. एका 24 वर्षीय नराधमाने ३ वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिचा दगडाने ठेचून निर्घृणपणे खून केला. विजय संजय खैरनार असं या नराधम आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी या नराधमाला अटक केली आहे. पण, किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचा बदला म्हणून त्याने हे कृत्य केल्याचं समोर येताच कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. आरोपी विजय खैरनारला आमच्या ताब्यात द्या, गावातच त्याला फासावर लटकवू, अशी संतप्त प्रतिक्रिया मृत मुलीचे वडील आणि नातेवाईकांनी दिली.
advertisement
नेमकं काय घडलं?
डोंगराळे गावात ही घटना ३ दिवसांपूर्वी घडली होती. विजय संजय खैरनार या नराधमाने ३ वर्षांच्या लेकीवर अत्याचार केले आणि बिंग फुटू नये म्हणून नंतर अक्षरश: दगडाने ठेचून त्या चिमुकलीची हत्या करून टाकली.. त्यानंतर तिचा मृतदेह हा गावातच निर्जनस्थळी फेकून दिला होता. मुलगी बेपत्ता झाल्यामुळे सगळ्यांनी शोध घेतला. तेव्हा एका ठिकाणी ही चिमुरडी जखमी अवस्थेत आढळली होती. चिमुरडीला रुग्णालयात नेलं असता तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
मृत परीच्या वडिलांच्या भांडणाचा राग
मृत चिमुरडीच्या वडिलांसोबत आरोपी विजय खैरनार याचे काही महिन्यांपूर्वी भांडण झालं होतं. या भांडणाचा बदला घेण्यासाठी विकृत विजयने हे कृत्य केल्याची गावात चर्चा आहे. पोलिसांनी विजयाला अवघ्या काही तासांमध्ये अटक केली. पण, आता गावकऱ्यांनी विजयला फाशी द्यावी अशी मागणी केली आहे. या मागणीसाठी गावात रास्ता रोको आणि बंदही पाळण्यात आला. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी कुटुंबीयांची भेट घेतली. तर मंत्री दादा भुसे यांनीही कडक कारवाईचं आश्वासन दिलं आहे.
