मालमत्तेवरून वाढते कौटुंबिक वाद
भारतात घर, जमीन आणि इतर मालमत्तांबाबतचे वाद बहुतेक वेळा मृत्युपत्रामुळेच उद्भवतात. मृत्युपत्र स्पष्ट नसणे, नोंदणी न करणे किंवा काही वारसांना डावलणे यामुळे कुटुंबात तणाव निर्माण होतो. विशेषतः मुली वारस असतील तर अनेकदा त्यांच्या हक्कांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते, जे कायद्याने चुकीचे आहे.
नोंदणीकृत नसलेले मृत्युपत्र वैध असते का?
advertisement
भारतीय कायद्यानुसार मृत्युपत्र नोंदणीकृत असणे बंधनकारक नाही. मृत्युपत्र योग्य पद्धतीने लिहिलेले असेल, त्यावर मृत व्यक्तीची स्वाक्षरी असेल, दोन साक्षीदारांची साक्ष असेल आणि ते कोणत्याही दबावाखाली किंवा फसवणुकीतून तयार झालेले नसेल, तर असे मृत्युपत्र कायदेशीरदृष्ट्या पूर्णपणे वैध मानले जाते. त्यामुळे केवळ नोंदणी नाही म्हणून मृत्युपत्र रद्द ठरत नाही.
मृत्युपत्र नसेल तर मालमत्ता कशी विभागली जाते?
जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू मृत्युपत्र न करता झाला, तर तो ‘इंटेस्टेट डेथ’ मानला जातो. अशा परिस्थितीत कायद्यानुसार मालमत्ता सर्व कायदेशीर वारसांमध्ये समान प्रमाणात विभागली जाते. यामध्ये मुले, मुली, पत्नी, आई (जिवंत असल्यास) यांचा समावेश होतो. कोणत्याही एका वारसाला जास्त किंवा कमी वाटा देणे कायदेशीर नाही.
मुलींना मालमत्तेत हक्क आहे का?
२००५ मधील कायद्यातील सुधारणेनंतर मुलींना मुलांइतकेच समान अधिकार देण्यात आले आहेत. वडिलोपार्जित तसेच वैयक्तिक मालमत्तेत मुलींचा पूर्ण हक्क आहे. मृत्युपत्र असले तरी मुलींना पूर्णपणे डावलता येत नाही. त्यांना कायदेशीर वाटा नाकारल्यास न्यायालयात तो निर्णय आव्हान देता येतो.
वैयक्तिक आणि वडिलोपार्जित मालमत्तेतील फरक
वैयक्तिक मालमत्ता म्हणजे स्वतःच्या उत्पन्नातून खरेदी केलेली संपत्ती, ज्यावर व्यक्तीला मृत्युपत्राद्वारे वाटप करण्याचा पूर्ण अधिकार असतो. वडिलोपार्जित मालमत्तेत मात्र सर्व वारसांचा जन्मसिद्ध हक्क असतो. त्यामुळे या दोन्ही प्रकारच्या मालमत्तेच्या वाटणीत कायदेशीर फरक असतो.
आंशिक मृत्युपत्र असल्यास काय होते?
कधी कधी मृत्युपत्रात फक्त काही मालमत्तांचा उल्लेख केलेला असतो. अशा वेळी मृत्युपत्रात नमूद केलेली मालमत्ता त्यानुसार वाटली जाते, तर उर्वरित मालमत्ता सर्व कायदेशीर वारसांमध्ये समान विभागली जाते.
वाद टाळण्यासाठी काय करावे?
मालमत्तेवरून भविष्यात वाद होऊ नयेत यासाठी वेळेत स्पष्ट, सविस्तर आणि कायदेशीर मृत्युपत्र करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मृत्युपत्रात सर्व मालमत्तेचा स्पष्ट उल्लेख केल्यास आणि वारसांची नावे नमूद केल्यास कुटुंबातील संघर्ष टाळता येतो. विशेषतः मोठे कुटुंब आणि अधिक वारस असतील तर मृत्युपत्र करणे ही काळाची गरज ठरते.
