अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे बारामती विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. नियमानुसार, जागा रिक्त झाल्यापासून सहा महिन्यांच्या आत पोटनिवडणूक घेणे बंधनकारक असते. त्यानुसार निवडणूक आयोगाने आता प्रशासकीय तयारी सुरू केली असून, मतदार यादी अद्ययावत करण्यावर भर दिला जात आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार, १ जानेवारी २०२६ हा 'अर्हता दिनांक' निश्चित करण्यात आला आहे. याचा अर्थ असा की, ज्या तरुणांनी १ जानेवारी २०२६ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण केली आहेत, त्यांना या यादीत नाव नोंदवण्याची संधी मिळणार आहे. तसेच, स्थलांतरित किंवा मृत मतदारांची नावे वगळून ही यादी अधिक पारदर्शक आणि अद्ययावत केली जाणार आहे.
advertisement
सोमवार, ९ फेब्रुवारी २०२६ रोजी या मतदारसंघाची एकत्रित प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर मतदारांना आपली नावं तपासता येतील. नाव नसल्यास किंवा दुरुस्ती असल्यास विहित मुदतीत दावे आणि हरकती नोंदवता येतील. सर्व दावे आणि हरकती निकाली काढल्यानंतर साधारणतः मार्च महिन्यात अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर निवडणुकीचा प्रत्यक्ष कार्यक्रम जाहीर होऊ शकतो.
खरं तर, विधानसभेची एखादी जागा रिक्त झाली, तर सहा महिन्यांच्या आत तिथे नवा सदस्य निवडून येणं गरजेचं आहे. जूननंतर महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होऊ शकते, अशा स्थितीत मे महिन्याच्या आधीच ही पोटनिवडणूक पार पाडण्याचा प्रयत्न निवडणूक आयोगाचा असू शकतो. त्याअनुषंगाने आता आयोगानं पावलं उचलायला सुरुवात केली आहे.
