अजित पवारांची आठवण सांगताना सतीश राऊत यांनी सांगितलं की, मी शरद पवारांचा ओएसडी म्हणून रुजू झालो. दादांची एक धडाडी असायची. त्यांना लांबून पाहिलं तरी धडकी भरायची. त्यामुळे त्यांच्या जवळ जाण्याचं धाडस होत नसायचं. परंतु मी साहेबांची इमानेइतबारे सेवा करतो, याचं दादांना मोठं अप्रूप होतं. याचा साक्षात्कार मला फार उशीरा झाला. दादांचा स्पीड खूप असायचा. साहेबांच्या कार्यालयात जायचं झालं, तरी ते एकदम भरधाव वेगाने जायचे. त्यांना नमस्कार करेपर्यंत दादा आतमध्ये पोहोचलेले असायचे. इतकी धडाडी त्या माणसामध्ये होती."
advertisement
"आपण त्यांच्या गिनतीत आहोत की नाही? याची देखील शंका माझ्या मनात असायची. पण एकेदिवशी अशाच एका आमदारांचा मला फोन आला. तुमच्याबद्दल दादा खूप चांगलं बोलत होते, असं त्यांनी मला सांगितलं. मी दादांना नमस्कार केला तरी दादा वेगानं निघून जातात. अशा स्थितीत माझी तिथे मोजदाद आहे का? असा प्रश्न मला पडला. आमदारांना खासदारांना अडचणीत आणायचं असेल तर त्यांचे पीए लोक अडचणीत आणतात, असं दादा बोलत होते. माझ्या कारकिर्दीत मी चार पाच चांगले पीए पाहिले. त्यात त्यांनी किशोर राजेनिंबाळकरांचं नाव घेतलं, त्यानंतर म्हणाले, आमच्या साहेबांकडे आहेत ते राऊत..." असं त्यांनी माझं कौतुक केलं होतं.
सतीश राऊत पुढे म्हणाले, "सगळ्यांना वाटतं ते कडक होते, पण कडक माणूस अजिबात निष्ठूर नसतो, प्रचंड भावनाविवश होणारा असतो. मागच्या कृषक कार्यक्रमाच्या व्यासपीठावर दादा आणि साहेब एकमेकांकडे पाहत नव्हते. ही बाब दोघांवर प्रेम करणाऱ्या सगळ्यांना खटकली होती. मलाही खटकली. यानंतर मी दादांच्या जवळच्या एका व्यक्तीकडे म्हटलं की, दादा आणि साहेबांनी एकमेकांकडे पाहिलं नाही, कसं तरी वाटलं. या घटनेनंतर १५ व्या दिवशी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये दादा आले. ते हेलिकॉप्टरमधून उतरले. धडधड वेगात थेट साहेबांच्या केबिनमध्ये गेले आणि २० मिनिटं संवाद केला. त्यानंतर हा प्रसंग बघून मला खूप बरं वाटलं, १५ दिवसांपूर्वी हा प्रसंग घडला आणि आज दादा साहेबांसोबत बोलत आहेत."
"दादा एवढ्यावर थांबले नाहीत, दादाचं ग्रेटनेस किती होतं ते सांगतो, रात्री त्या कार्यकर्त्याचा मला फोन आला, त्याने सांगितलं, दादा विचारत होते तुमच्या दोस्ताला विचारलं का मी आज कसा वागलो? अहो... माझी काय औकात आहे हो... मी फक्त मनातलं मोकळं केलं होतं. पण दादांनी ती बाब लक्षात ठेवली, १५ दिवसानंतर ते साहेबांसोबत २० मिनिटं बोलले आणि संध्याकाळी पोहोच पावती देखील दिली," असा किस्सा सतीश राऊत यांनी सांगितला.
