शरद पवारांना सध्या वाय दर्जाची सुरक्षा आहे. पण केंद्रीय गृहमंत्रालयाने नुकतीच शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला. सुरक्षेत वाढ करण्यात आल्याबाबत 15 ऑगस्ट रोजी शरद पवारांना गृह मंत्रालयाकडून पत्र पाठवण्यात आलं होतं. शरद पवारांना सुरक्षा देण्यामागची पार्श्वभूमी काहीशी अशी होती.
आयबी अर्थात गुप्तचर विभागानं 15 ऑगस्टला एक अहवाल दिला. आयबीच्या या अहवालानंतरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय गृहखात्याने घेतला. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीनं सुरक्षा वाढवण्याचं कारण मात्र गुप्त ठेवलं. पण, मागील काही दिवसांपूर्वी पवारांना देण्यात आलेल्या धमक्यांचा संदर्भ दिला गेला, त्यामुळे तब्बल 55 जवान असलेली सीआरपीएफची एक तुकडी शरद पवारांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्याचा निर्णय घेतला गेला.
advertisement
झेड प्लस सुरक्षा ही भारतातील सर्वात मोठी सुरक्षा मानली जाते. झेड प्लस सुरक्षेत 10 पेक्षा जास्त कमांडो आणि पोलीस कर्मचाऱ्यांसह 55 प्रशिक्षित कर्मचारी तैनात असतात. हे सर्व कमांडो 24 तास त्या व्यक्तीभोवती बारीक नजर ठेवून असतात. या सुरक्षा व्यवस्थेतला प्रत्येक कमांडो मार्शल आर्ट तज्ज्ञ असतो. हे कंमांडोज आधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज असतात.
झेड प्लस सुरक्षेसंदर्भात शुक्रवारी पवारांच्या दिल्लीतील घरी बैठक पार पडली. या बैठकीत शरद पवारांनी ही सुरक्षा अंशतः नाकारल्याची सुत्रांची माहिती आहे. या सुरक्षेतल्या काही अटी पवारांना मंजूर नसल्याचं कळतंय.
पवारांना अटी अमान्य
सुरक्षा दलाकडून दिलेली गाडीच वापरावी, असा आग्रह शरद पवारांना करण्यात आला. पण, पवारांनी सुरक्षा दलाची गाडी वापरण्याचा आग्रह अमान्य केल्याची माहिती आहे. तसंच घराच्या आत सुरक्षाकडं नसावं, अशी सूचना शरद पवारांनी केल्याचीही माहिती सूत्रांकडून मिळते आहे. शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानाच्या भिंतीची उंची वाढवण्याच्या सूचनाही सुरक्षा दलानं दिल्या. या बैठकीत धोका नेमका काय आहे? आणि कुणापासून संभावतो याची माहितीही शरद पवारांना देण्यात आल्याचं कळतंय.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या हालचालींना वेग आलाय.. पवार राज्यभरात दौरे करुन त्यांचे विधानसभा उमेदवार निश्चित करत आहेत. अशावेळी केंद्र सरकारची सुरक्षा म्हणजे पवारांनी म्हटल्याप्रमाणे त्यांना हेरगिरीचा संशय येतोय. आता शरद पवार केंद्राची ही सुरक्षा स्वीकारतात की नाही हे पहावं लागेल.