निवडणुकीआधीच काळाचा घाला
मिळालेल्या माहितीनुसार, अवघ्या २४ वर्षांचे असलेले नितीन वाघमारे हे एक उत्साही आणि तरुण उमेदवार होते. त्यांनी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रचाराला जोरदार सुरुवात केली होती. नागरिकांशी भेटीगाठी, पदयात्रा आणि सभांच्या माध्यमातून ते सक्रिय होते.
मात्र, काल रात्री झोपेत असताना त्यांना हृदयविकाराचा जोरदार झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. निवडणुकीच्या प्रचाराचा अतोनात ताणतणाव त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरला असावा, अशी चर्चा आता शहरात सुरू झाली आहे. निवडणुकीच्या कामाच्या गडबडीने या तरुण उमेदवाराचा बळी घेतल्याचे बोलले जात आहे.
advertisement
राजकीय नेत्यांकडून श्रद्धांजली
नितीन वाघमारे यांच्या निधनाचं वृत्त कळताच मनमाड शहरातील विविध राजकीय पक्षाचे नेते आणि पदाधिकारी यांच्या निवासस्थानी तातडीने पोहोचले. त्यांनी वाघमारे यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आणि वाघमारे कुटुंबीयांचे सांत्वन केले.
वॉर्डची निवडणूक पुढे ढकलणार?
निवडणूक जाहीर झाली असताना उमेदवाराचे निधन झाल्यामुळे आता प्रभाग क्रमांक १० 'अ' मधील निवडणूक पुढे ढकलली जाणार का? असा महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोग काय निर्णय घेतो, याकडे मनमाडकर नागरिकांचे आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं आहे.
