ठाणे - एका महिलेने जर ठरवले तर ती महिला एक यशस्वी उद्योजक बनू शकते आणि समाजासमोर एक प्रेरणादायी उदाहरण दाखवू शकते. आज अशाच एका महिलेची कहाणी आपण जाणून घेणार आहोत, ज्यांनी फक्त भाकरीचा व्यवसाय करून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे.
रंजना वाघमारे असे या महिलेचे नाव आहे. त्या ठाण्यात मागील अनेक वर्षांपासून स्वतःचा अन्नपूर्णा महिला गृह उद्योग चालवत आहे. ठाणे स्थानकापासून फक्त 15 मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या नितीन कंपनी येथे हा अन्नपूर्णा महिला गृह उद्योग आहे. एका भाकरी पासून ते 10 हजार भाकऱ्यांपर्यंत या गृह उद्योगामध्ये ऑर्डर येतात.
advertisement
रंजना वाघमारे या 45 वर्षीय महिलेने 2011 साली ठाण्यामध्ये घरातूनच अन्नपूर्णा महिला गृह उद्योगाला सुरुवात केली. सुरुवातीला त्या चपाती आणि भाकरी बनवून विकायच्या. हळूहळू त्यांचा हा व्यवसाय भरभराटीस आला. त्यानंतर 2 ते 3 वर्षांनी त्यांच्या हाताखाली 3 ते 4 महिला काम करायला लागल्या. सध्या रंजना वाघमारे यांच्या अन्नपूर्णा महिला गृह उद्योगाच्या माध्यमातून 30 ते 40 महिलांना रोजगार दिला जात आहे.
या अन्नपूर्णा महिला गृह उद्योगात तांदूळ भाकरी, ज्वारी भाकरी, बाजरी भाकरी, पुरणपोळी हे सगळे पदार्थ मिळतात. इथे तांदळाच्या एका भाकरीची किंमत फक्त 12 रुपये तर, नाचणी आणि बाजरीच्या भाकरीची किंमत 15 रुपये आहे.
'मी 2011 रोजी हा व्यवसाय सुरू केला. असे म्हणतात की, एका यशस्वी पुरुषामागे खंबीर स्त्रीचा हात असतो. मात्र, माझ्या बाबतीत मात्र माझ्या पतीची माझ्या संपूर्ण प्रवासात खंबीर साथ होती. त्यांच्यामुळेच हे सगळे करू शकले. सुरुवातीला जेव्हा मी घरात बसून होते, तेव्हा वाटायचं की असं काहीतरी काम करायला हवं जेणेकरून आपल्या सोबतच इतरही स्त्रियांना रोजगार उपलब्ध होईल आणि त्यातूनच या व्यवसायाची सुरुवात झाली,' अशी प्रतिक्रिया उद्योजिका रंजना वाघमारे यांनी लोकल18 शी बोलताना दिली.
रंजना वाघमारे यांच्या या व्यवसायामुळे अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. फक्त भाकरी आणि चपातीच्या व्यवसायातील रंजना गेल्या अनेक वर्ष लाखोंचा व्यवसाय करत आहेत. व्यवसाय करू पाहणाऱ्या स्त्रियांसाठी त्या एक उत्तम प्रेरणादायी उदाहरण आहेत.