Gold Rate: भारतीय बाजारपेठेत सोने आणि चांदीच्या दरांनी विक्रमी उच्चांक गाठला आहे. सोन्याचा दर हा प्रति तोळा एक लाख 16 हजारांच्या घरात पोहचला आहे. चांदीचा दरही प्रतिकिलो हा एक लाख 32 हजारापर्यंत झाला आहे. सोनं-चांदीच्या दरात मागील काही दिवसांपासून चांगलीच वाढ झाली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव प्रति औंस 3750 डॉलर्सच्या पुढे गेला आहे. अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने केलेल्या मोठ्या व्याजदर कपातीमुळे सोन्याचा दर वाढला असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, काही रिपोर्टनुसार, कमकुवत होत असलेला डॉलर, भू-राजकीय तणाव, आरबीआय सारख्या मध्यवर्ती बँकांकडून झालेली सोन्याची खरेदी यामुळे सोन्याच्या दरात वाढ होत असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याचा दर प्रति औंस हा 4000 डॉलर्सवर पोहचण्याचा अंदाज आहे.
advertisement
सोन्याच्या किमतीत सोमवारी मोठी वाढ झाली, केवळ भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजारातही विक्रमी पातळी गाठली.
नवीन विक्रम: वायदे बाजारात एमसीएक्सवर सोने (ऑक्टोबर डिलिव्हरी) प्रति 10 ग्रॅम 1,12,000 रुपयाच्या जवळ पोहोचले. हा आतापर्यंतचा उच्चांक आहे. तर चांदीचा (डिसेंबर डिलिव्हरी) दर प्रति किलो 1,33,000 रुपयांवर पोहोचली. गेल्या वर्षभरात, सोने 75,000 वरून 1.12 लाखांपर्यंत वाढले आहे, तर चांदी 87,000 वरून 1.33 लाखांपर्यंत वाढली आहे.
ऐतिहासिक वाढ: सोन्याने पहिल्यांदाच प्रति औंस 3750 डॉलरचा दर गाठला आहे. आता प्रति औंसचा दर हा 3800 डॉलरच्या घरात पोहचला आहे. चांदीचा दर हा 44 डॉलर प्रति औंस झाला आहे. चांदीच्या दराने मागील 14 वर्षातील उच्चांक गाठला आहे.
>> सोन्याच्या दरात वाढ का? ही आहेत पाच कारणे
1. अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने, फेडरल रिझर्व्हने अलीकडेच व्याजदरात 0.25 टक्क्यांची कपात केली आहे. त्याशिवाय आणखी दोन वेळेस दर कपात होण्याचे संकेत दिले आहेत. यामुळे डॉलर कमकुवत झाला आणि सोने आणि चांदीची मागणी वाढली आहे.
2. 2025 मध्ये डॉलर निर्देशांक जवळजवळ 10 टक्क्याने घसरला आहे. त्यामुळे सोने आणि चांदी अधिक परवडणारे आणि परदेशी गुंतवणूकदारांसाठी आकर्षक बनले आहे.
3. रशिया-युक्रेन, चीन-तैवान आणि मध्य पूर्वेतील अस्थिरतेमुळे गुंतवणुकीसाठी "सुरक्षित-आश्रयस्थान" असलेल्या सोने आणि चांदीच्या किमती वाढल्या आहेत.
4. अमेरिका-चीन तणाव आणि व्यापार अनिश्चिततेमुळे मध्यवर्ती बँका सतत सोने खरेदी करत आहेत.
5. चांदीची औद्योगिक मागणी देखील वाढण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे त्याच्या किमती आणखी वाढतील.
पुढे काय होणार आहे?
तज्ज्ञांनी ‘सीएनबीसी आवाज’ला सांगितले की फेडने केलेल्या व्याजदर कपातीमुळे अमेरिकेतील कर, व्यापार तणाव आणि कमकुवत कामगार बाजारामुळे सोन्याचे आकर्षण वाढले. एचडीएफसी सिक्युरिटीजचे सौमिल गांधी म्हणतात की फेडच्या नकारात्मक संकेतांनंतर आणखी दोन व्याजदर कपात शक्य आहेत, ज्यामुळे डॉलर आणि उत्पन्नावर दबाव येईल, ज्यामुळे सोने आणि चांदीला फायदा होईल.
डच बँक आणि गोल्डमन सॅक्स दोघांचाही अंदाज आहे की पुढील वर्षी सोने प्रति औंस 4000 डॉलरपर्यंत पोहोचू शकते. चांदी देखील सोन्या प्रमाणेच तेजीत राहिल.