भारतीय रेल्वेनं दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा तुम्ही रेल्वेमध्ये सीट बुक करता, तेव्हा रेल्वे तुमच्याकडून फक्त प्रवास भाडं आकारते. इतर कोणतेही चार्ज आकारत नाही. परंतु, जर तुम्ही संपूर्ण डबा किंवा रेल्वे बुक केली, तर तुम्हाला विविध चार्ज द्यावे लागतात. या संदर्भात रेल्वे तज्ज्ञांचं मत आहे की, ‘सीट बुक करण्याच्या तुलनेत संपूर्ण डबा बुक करण्यासाठी तुम्हाला जवळपास तिप्पट पैसे मोजावे लागतात. त्यामुळे केवळ सीट बुक करणं फायदेशीर ठरतं.’
advertisement
सीट बुक करणं स्वस्त पण ही आहे समस्या
रेल्वेचा संपूर्ण डबा बुक करण्याच्या तुलनेत सीट बुक करणं स्वस्त असलं तरी यामध्ये एक समस्या आहे. ती म्हणजे एका पीएनआरमध्ये सहा पेक्षा जास्त तिकिटं बुक करता येत नाहीत. त्यामुळे वेगवेगळी तिकिटं काढावी लागतील आणि यामध्ये वेगवेगळ्या डब्यांमध्ये देखील जागा मिळू शकते. जरी तुम्ही एका डब्यातील सर्व 72 तिकिटं काढण्यासाठी 12 जण रांगेत उभे केले, तरी तुम्हाला एकाच डब्यातील सर्व तिकिटं मिळतील, याची खात्री नाही. कारण रेल्वे तिकीट बुकिंग एकाच वेळी ऑफलाइन आणि ऑनलाइन सुरू असतं.
चार्जमुळे वाढते रक्कम
रेल्वेचा डबा किंवा संपूर्ण रेल्वेचं बुकिंग फुल टेरिफ रेट म्हणजेच एफटीआरवर केलं जातं. यामध्ये प्रति डबा 50 हजार रुपये सिक्युरिटी चार्ज द्यावा लागतो. प्रवासाच्या सुरुवातीच्या स्थानापासून शेवटच्या स्थानापर्यंतचे येण्या-जाण्याचं भाडं द्यावं लागतं. प्रवासासाठी 30 टक्के सर्व्हिस चार्जदेखील भरावा लागतो. प्रवास किमान 200 किमी असावा लागतो. गाडी इतर ठिकाणी थांबवल्यास त्याचे चार्ज वेगळे भरावे लागतात. यासोबतच एसी आणि फर्स्ट क्लास डब्याच्या बुकिंगसाठी पाच टक्के जीएसटी भरावा लागतो. सुपरफास्ट गाडीतील डबा असल्यास सुपरफास्ट चार्ज द्यावा लागतो. जर तुम्ही संपूर्ण रेल्वे गाडीचं बुकिंग केलं, तर इंजिन स्टॉपिंग चार्जेस देखील भरावे लागतात.
काय आहेत बुकिंग नियम?
रेल्वेचा डबा किंवा संपूर्ण रेल्वे बुक करण्यासाठी आयआरसीटीसीच्या मध्यम किंवा विभागीय किंवा मुख्य ऑफिसमध्ये जावे लागेल. येथे एकूण बुकिंगच्या पाच टक्के चार्ज भरावा लागेल. बुकिंग किमान एक महिना अगोदर करावी लागेल.