आयटीआर फाइल केल्यानंतर आतापर्यंत आयटीआर व्हेरिफाय केला नसेल, तर लवकरात लवकर तो व्हेरिफाय करायला हवा. आयटीआरचं व्हेरिफिकेशन तो फाइल करण्याइतकंच महत्त्वाचं आहे. आयटीआर व्हेरिफिकेशन कसं करायचं, याची माहिती घेऊ या.
बहुतांश टॅक्सपेयर्स आयटीआर फाइल करतानाच त्याचं व्हेरिफिकेशनही करतात. तरीही अनेकदा असं होतं, की काही टॅक्सपेयर्स हाताबरोबर लगेचच आयटीआर व्हेरिफाय करायचं टाळतात. त्यातून असं होऊ शकतं, की आयटीआर व्हेरिफाय करण्याचा कालावधी संपून जाऊ शकतो आणि त्यानंतर व्हेरिफिकेशन केल्यास दंड भरावा लागू शकतो. आयटीआर फाइल केल्यानंतर त्याच्या व्हेरिफिकेशनसाठी 30 दिवसांचा अवधी मिळतो. या कालावधीत आयटीआर व्हेरिफिकेशन केलं नाही, तर 5000 रुपये दंड भरावा लागू शकतो.
advertisement
आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयटीआरमध्ये तुम्हाला काही रिफंड मिळणार असेल, तर ती रक्कमदेखील व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय तुमच्या खात्यात जमा होणार नाही. त्यामुळेच आयटीआर फाइल करण्याबरोबरच त्याचं व्हेरिफिकेशन करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. पूर्वी टॅक्सपेयर्सना आयटीआर फाइल केल्यानंतर त्याच्या व्हेरिफिकेशनसाठी 120 दिवसांचा कालावधी दिला जात असे; मात्र आता तो कमी करून 30 दिवसांवर आणण्यात आला आहे.
इन्कम टॅक्स रिटर्न व्हेरिफाय करण्याची पद्धत खूप सोपी आहे. त्यासाठी आधार कार्ड, बँक अकाउंट, डीमॅट अकाउंट, नेटबँकिंग असे वेगवेगळे पर्याय उपलब्ध असतात. त्या माध्यमातून काही मिनिटांतच आयटीआर व्हेरिफिकेशन पूर्ण करता येतं. अर्थातच, ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुमचा रजिस्टर्ड मोबाइल नंबर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्या नंबरवर एक वन टाइम पासवर्ड पाठवला जातो. तो पासवर्ड सबमिट केल्यानंतर व्हेरिफिकेशन पूर्ण होतं.
