रांची : व्यवसाय करण्यासाठी आधी आपल्याला काही गुंतवणूक करावी लागते. मात्र, कोणतीही गुंतवणूक न करता महिन्याला 40 ते 50 हजार रुपयांची कमाई होईल, असं जर तुम्हाला सांगितलं तर कदाचित तुम्हाला विश्वास नाही बसणार. पण हे खरे आहे. एका महिलेने हे सिद्ध करुन दाखवले आहे.
कनक अग्रवाल असे या महिलेचे नाव आहे. त्या झारखंडच्या रांची येथील अपर बाजारातील रहिवासी आहेत. 57 वर्षीय कनक अग्रवाल यांच्याशी लोकल18 च्या टीमने संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, जेव्हा माझे लग्न झाले आणि दोन मुले झाली तेव्हा मला जाणवले की, मीही काही व्यवसाय करून पैसे कमवावे. यानंतर मला माझ्या पायावर उभे राहायची इच्छा झाली. त्यात लहानपणापासूनच, मला भरतकाम आणि विणकामात खूप रस होता. म्हणून मी हे काम माझा व्यवसाय म्हणून निवडले. याशिवाय नवीन नवीन डिझाइनच्या कुर्त्या बनवण्याची कला माझ्याकडे होती.
advertisement
शून्य रुपये गुंतवणूक -
कनक यांनी सांगितले की, जेव्हा मी हे काम करण्याचा विचार केला तेव्हा मला कुठून सुरुवात करावी हे कळत नव्हते. म्हणून मी एका दुकानातून 20 साड्या आणि कुर्ते घेतले. तसेच त्यांना सांगितले की, मी त्या यात्रेत जितक्या विकल्या जातील तितक्या विकेन आणि बाकीचे तुम्हाला परत करीन. यानंतर मात्र, त्यादिवशी माझे नशीब इतके चांगले होते की, सर्व कुर्त्या, साड्या विकल्या गेल्या आणि या माध्यमातून फक्त एका दिवसात मी 20,000 रुपयांचा नफा कमावला. म्हणून मग हे 20 हजार माझ्यासाठी वरदान ठरले आणि यातून मी माझ्या मालाची खरेदी सुरू केली.
यानंतर त्यांनी पुढे सांगितले की, माझ्याजवळ तुम्हाला हँड एम्ब्रॉयडरी हॅण्ड पर्स, मिनी पर्स, फॅशनेबल कुर्ते, लहरिया कुर्ती आणि साड्या, सिल्क साड्या, फ्लोरल डिझाइनच्या साड्या मिळतील. याशिवाय कानातले, नेकलेस, कुंदन ज्वेलरी, डायमंड ज्वेलरी असे हाताने बनवलेले दागिने मिळतील. लोकांना सुंदर दुपट्ट्यात हाताने काम केलेले जरीचे काम आवडत असल्याचे त्यांनी सांगितले.
चार शिलाई मशीन ते आज होलसेलचा व्यवसाय -
कनक यांनी सांगितले की, मला मिळालेल्या नफ्याच्या पैशातून मी सर्वात आधी चार शिलाई मशीन विकत घेतल्या. तसेच आजही त्या चार मशीन माझ्याकडे आहेत. यासोबतच माझ्याकडे 7 ते 8 मुली डिझाईन बनवण्याचे काम करतात. मला रायपूर, पाटणा, कोलकाता येथूनही ऑर्डर मिळतात. तर बेंगळुरू, मुंबई आणि चेन्नई येथे राहणारे लोक माझ्याकडून होलसेल भावाने वस्तू खरेदी करतात आणि नंतर किरकोळ किमतीत विकतात, असे त्या म्हणाल्या.
कुटुंबीयांचे मिळाले सहकार्य -
त्यांनी पुढे सांगितले की, सुरुवातीच्या काळात मला महिन्याला 10 ते 15 हजार रुपयांचा नफा मिळाला होता. मात्र, आज मुलींना त्यांचा पगार दिल्यानंतरही मला 40 ते 50 हजार रुपयांचा नफा होतो. माझ्या या प्रवासात माझे सासरे आणि माझ्या पतीचे मोठे योगदान राहिले आहे. अनेकदा मी रात्रीचे जेवण साडेदहा वाजेपर्यंत बनवायची तरीसुद्धा माझे सासरे कधीही माझ्यावर रागावले नाही. तसेच त्यांनी काही तक्रार केली नाही. तु आधी तुझे काम पूर्ण कर, अशा पद्धतीने त्यांनी मला सहकार्य केले. त्यामुळे मी आज इथपर्यंत पोहोचल्याचे त्यांनी सांगितले.