मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मराठी भाषेवरून सतत काही ना काही वाद होत आहे. मुंबईत मराठीचा मुद्दा ऐरणीवर आला असून ठिकठिकाणी ही प्रकरण वाढत चालली आहेत. दरम्यान मुंबईजवळील वसई किल्ला पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा परिधान करून शूटिंग करण्यासाठी आलेल्या एका तरुणाला सुरक्षा रक्षकांनी रोखल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.
advertisement
शिवछत्रपतींच्या वेशभूषेत आलेल्या व्यक्तीला रोखल्याची घटना सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली. त्यानंतर ब्रिजेश कुमार गुप्ता या मुजोर सुरक्षारक्षकाला मनसेच्या शाखेमध्ये बोलावून माफीनामा बोलावून घेतला. मात्र याच पवित्र वास्तूमध्ये प्रेमीयुगलांचे चाळे, प्री-वेडिंग शूटिंग, पिक्चरचे शूटिंग या सगळ्यांना रान मोकळे असून छत्रपतींनाच मज्जाव केल्यामुळे मनसे संतप्त झाली आहे.
मनसेचा इशारा
वसई किल्ल्यावर धक्कादायक घटना घडली आहे. शिवछत्रपतींच्या वेशभूषेत आलेल्या एका व्यक्तीला 'मराठी नको, हिंदीत बोला' असे सांगत परप्रांतीय सुरक्षारक्षकाने रोखल्याचा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. मराठी संस्कृतीचा आणि अस्मितेचा अपमान झाल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नालासोपारा शहर संघटक श्रीधर उर्फ रवी पाटेकर यांनी किल्ल्यामध्ये फक्त मराठी माणसाला नोकरी द्यावी अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने समाचार घेऊ असे सांगितले.
वसई किल्ल्यावर आंदोलनाचा इशारा
मराठी एकीकरण समिती यांनी खरमरीत टीका केली आहे. मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख म्हणाले, आता असं वाटतंय की तलवारीचा खरा वापर करण्याची वेळ पुन्हा आली आहे. महाराष्ट्रात मराठी माणूसच परका वाटायला लागला आहे. मतांच्या राजकारणामुळे परप्रांतीय माजोरडे झाले आहेत
या घटनेनंतर मनसे,मराठी संघटना आणि नागरिकांनी वसई किल्ल्यावर आंदोलनाचा इशारा दिला आहे.
प्रशासनाकडून मात्र या प्रकरणाबाबत अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
पुरातत्व विभागावर टीका
या घटनेमुळे सोशल मीडियावर आणि स्थानिक नागरिकांमध्ये पुरातत्व विभागाच्या कार्यपद्धतीवर मोठी टीका होत आहे. "किल्ल्यासारख्या ऐतिहासिक ठेव्याचे पावित्र्य राखण्यासाठी आणि शिस्त पाळण्यासाठी प्रशासन खरोखरच जागे आहे का?" असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.