त्याआधी, उत्तराखंडच्या सिल्कयारा बोगद्यातील बचाव कर्मचार्यांनी मंगळवारी ढिगाऱ्याच्या आत 60 मीटर ड्रिलिंग पूर्ण केले. त्यानंतर ड्रिल केलेल्या मार्गाद्वारे बचाव पाईपचा शेवटचा भाग आतमध्ये सरकवण्यात आला. या पाईपद्वारेच 17 दिवस बोगद्यात अडकलेले कामगार बाहेर येऊ शकले. 12 नोव्हेंबर रोजी बोगद्याचा एक भाग कोसळल्याने आतमध्ये 41 कामगार अडकले होते.
बचावकार्य कसं यशस्वी झालं?
सिल्कयारा येथील रेस्क्यू टीमने कामगारांना वाचवण्यासाठी रॅट-होल मायनिंग तंत्रज्ञानाचा वापर केला. मोठमोठ्या आधुनिक मशीन्स जे करू शकत नाहीत, ते साध्य केलं. याआधी ढिगाऱ्यात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी ऑजर मशीनच्या साह्याने ड्रिलिंग करण्यात येत होते. त्यानंतर सोमवारी ‘रॅट-होल’ मायनिंग तंत्राचा वापर करून हाताने डेब्रिज हटवण्यास सुरुवात झाली.
पंतप्रधानांच्या प्रधान सचिवांनी घेतला आढावा
बचाव कार्याच्या 16 व्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव प्रमोद कुमार मिश्रा यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांच्यासोबत केंद्रीय गृहसचिव अजय कुमार भल्ला आणि उत्तराखंडचे मुख्य सचिव एस. एस. संधूही होते. प्रधान सचिवांनी बोगद्यात अडकलेल्या कामगारांशी आणि त्यांच्या कुटुंबियांशी चर्चा केली. बोगद्यात अडकलेल्या कामगारांच्या वतीने गब्बर सिंह नेगी यांनी मिश्रा यांच्याशी संवाद साधला.
मेडिकल चेकअपसाठी आठ बेडची व्यवस्था
बोगद्यातून बाहेर येताच सर्वांत आधी कामगारांचं मेडिकल चेकअप केलं जाईल. त्यासाठी बोगद्यातच आठ बेड बसवण्यात येतील. 41 अॅम्बुलन्स आणि डॉक्टरांची टीम तैनात करण्यात येणार आहे.