हर घर तिरंगा हे सरकारचं अभियान 9 ऑगस्टला सुरू झालं आहे. देशाच्या स्वातंत्र्यदिनापर्यंत म्हणजे 15 ऑगस्टपर्यंत ते सुरू राहणार आहे. नागरिकांनी या काळात आपापल्या घरावर झेंडा फडकवावा असं आवाहन सरकारनं केलंय. त्याकरिता नागरिकांनी झेंडा फडकवण्याबाबतचे नियमही जाणून घेतले पाहिजेत. त्यात एखादी चूक झाल्यास शिक्षादेखील होऊ शकते.
हर घर तिरंगा अभियान
advertisement
या अभियानामध्ये तुम्हाला झेंड्यासोबत सेल्फी घेऊन तो harghartiranga.com या वेबसाइटवर अपलोड करावा लागेल. ते करताना नियमही पाळले पाहिजेत. राष्ट्रध्वजाचा अपमान होऊ नये यासाठी अधिनियम 1971 आणि भारतीय ध्वज संहिता 2002 तयार करण्यात आली आहे. कोणतीही संस्था, व्यक्ती कोणत्याही प्रसंगी ध्वज फडकवू शकतात; मात्र त्या वेळी ध्वजाची केशरी पट्टी वर असली पाहिजे. राष्ट्रध्वज उभा फडकवण्यात येणार असेल, तर केशरी पट्टी उजव्या बाजूला असली पाहिजे. समोरच्या व्यक्तीला ती त्याच्या डाव्या बाजूला दिसेल.
सरकारी नियमांनुसार कोणताही नागरिक ध्वज फडकवू शकतो. अनुच्छेद 2.2 मध्ये तशी सूट देण्यात आली आहे; मात्र ध्वज स्पष्टपणे दिसेल असा फडकवला जावा. ध्वजारोहण करणारी व्यक्ती आदरयुक्त मुद्रेत असावी. ध्वज योग्य ठिकाणी ठेवावा. नियमांनुसार राष्ट्रध्वज घाणेरड्या ठिकाणी फडकवला जाऊ नये. एखादी गोष्ट वाटण्यासाठी, घेण्यासाठी किंवा वस्तूवर गुंडाळण्यासाठी ध्वजाचा वापर केला जाऊ नये. टेबलवर झाकण्यासाठी ध्वजाचा वापर करू नये. एकाच स्तंभावर राष्ट्रध्वजाबरोबर दुसरा ध्वज फडकवू नये. फाटलेला, मळलेला, चुरगाळलेला ध्वज फडकवू नये.
Independence day 2024: ... तर तुम्ही 15 ऑगस्टला तुमच्या गाडीवर लावू शकत नाही तिरंगा; समजून घ्या नियम
प्रत्येक व्यक्तीला गाडीवर झेंडा लावण्याची परवानगी नसते. ध्वजसंहितेतल्या अनुच्छेद 3.44 मध्ये काही विशेष व्यक्तींना तशी परवानगी देण्यात आलेली आहे. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल, उपराज्यपाल, पंतप्रधान, केंद्रीय कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री आणि केंद्रातले उपमंत्री त्यांच्या वाहनावर तिरंगा लावू शकतात. तसंच राज्यांचे मुख्यमंत्री, लोकसभेचे सभापती, राज्यसभा व लोकसभेचे उपसभापती, विधान परिषदांचे सभापती, विधान सभांचे उपसभापती, मुख्य न्यायाधीश, तसंच सरन्यायाधीश त्यांच्या वाहनांवर ध्वज लावू शकतात. त्याशिवाय आणखीही काही जणांना तशी परवानगी देण्यात आली आहे. हा नियम मोडल्यास अधिनियम 1971च्या कलम दोनच्या अंतर्गत तीन वर्षांचा तुरुंगवास किंवा दंडाची शिक्षा होऊ शकते किंवा दोन्हीही शिक्षा दिल्या जाऊ शकतात. राष्ट्रीय प्रतीकं आणि राष्ट्रगीताच्या अपमानाबाबातही ही शिक्षा दिली जाते.
आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकवताना प्रत्येक नागरिकानं ही काळजी घेणं गरजेचं आहे. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा व आपल्या राष्ट्राचा अपमान होणार नाही.