अयोध्या : आज लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मात्र, याआधीच अयोध्येतून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. देशात पुन्हा एकदा भाजपचे सरकार यावे आणि नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत, यासाठी प्रार्थना केली जात आहे.
विशेष म्हणजे नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत यासाठी बाबरी मशिदीचे माजी पक्षकार इक्बाल अन्सारी यांनी अल्लाहकडे दुवा मागितली. तसेच तपस्वी छावणीचे पीठाधीश्वर गुरु परमहंस आचार्य यांनी स्वस्ति वाचन करत देवाकडे नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यासाठी आशिर्वाद मागितला.
advertisement
तपस्वी छावणीचे पीठाधीश्वर जगतगुरू परमहंस आचार्य यांनी याबाबत बोलताना सांगितले की, लोकसभा निवडणूक जाहीर होण्यासाठी अवघे काही तास उरले आहेत. या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे आणि जगाचे लक्ष लागले आहे. मुस्लिम समाजाचे नेते आणि बाबरी मशिदीचे माजी पक्षकार इक्बाल अन्सारी यांच्यासह आपण पंतप्रधान मोदींनी तिसऱ्यांदा शपथ घ्यावी, यासाठी ईश्वराकडे प्रार्थना केली आहे. इक्बाल अन्सारी यांनीही अल्लाहची प्रार्थना केली.
जोपर्यंत देशात भाजपचे सरकार तयार होत नाही, तोपर्यंत आम्ही अशाप्रकारे प्रार्थना आणि वेद मंत्रांचे पठण करत राहू. मोदी है तो मुमकीन हैं असे म्हणत मोदीजींच्या नेतृत्त्वात देश पुढे जात आहे आणि आता लवकरच पीओके म्हणजे पाकव्याप्त काश्मिर भारताचा भाग होणार आहे. राष्ट्रच सर्वोपरि आहे, म्हणूनच आम्ही पंतप्रधान मोदींसाठी पूजा सुरू केली आहे.
इकबाल अन्सारी काय म्हणाले -
तर याबाब बाबरी मशिदीचे माजी पक्षकार इकबाल अन्सारी यांनी सांगितले की, तपस्वी छावणीचे प्रमुख परमहंस आचार्य यांच्यासमवेत अयोध्येच्या भूमीतून आम्ही देशात तिसऱ्यांदा भाजपचे सरकार स्थापन व्हावे आणि मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान व्हावेत, यासाठी देवाकडे प्रार्थना केली आहे. परमहंस आचार्य यांनी यासाठी देवाकडे प्रार्थना केली आहे आणि आम्ही अल्लाहकडे दुवा मागितली आहे.
अयोध्येत सर्व धर्माचे लोक राहतात. सर्व जाती-पंथांची मंदिरे आहेत. तसेच संतांचे आशीर्वाद घेण्यासाठी देश-विदेशातून लोक अयोध्येत येतात. नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यास देवी-देवता प्रसन्न होतील. अयोध्येतील जनता सुखी होईल, संत देखील आनंदी होईल, यासाठी आम्ही अयोध्येच्या भूमीतून देशाचे पंतप्रधान मोदींसाठी प्रार्थना करत आहोत, अशी प्रतिक्रिया इकबाल अन्सारी यांनी दिली.