Health Tips: साधा की खपली गहू, आरोग्यासाठी काय चांगलं? मधुमेह असणाऱ्यांनी काय खावं?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
Health Tips: सध्या रोजच्या आहारात अनेकजण गव्हाची पोळी खाण्यास प्राधान्य देतात. पण आरोग्यासाठी खपली की साधा गहू खावा? याबाबत अनेकांत संभ्रम असतो.
छत्रपती संभाजीनगर : आज आपल्या रोजच्या आहारात गहू हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. मात्र बाजारात सहज मिळणारा साधा गहू आणि सध्या पुन्हा चर्चेत आलेला खपली गहू, यामध्ये नेमका काय फरक आहे? आणि आरोग्याच्या दृष्टीने यापैकी कोणता गहू जास्त फायदेशीर आहे? याबाबत आपण लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
साधा गहू
साधा गहू मोठ्या प्रमाणावर शेतीमध्ये घेतला जातो. या गव्हापासून तयार होणारी पोळी मऊ, पांढरी आणि पटकन फुलणारी असते. त्यामुळे अनेक कुटुंबांमध्ये साध्या गव्हाची पोळी अधिक पसंत केली जाते. मात्र या गव्हामध्ये ग्लूटनचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे काही लोकांना पोटफुगी, अपचन, आम्लपित्त किंवा वजन वाढण्यासारख्या समस्या जाणवतात. विशेषतः मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी साध्या गव्हाची पोळी रक्तातील साखर लवकर वाढवू शकते.
advertisement
खपली गहू
खपली गहू हा हजारो वर्षांपूर्वीपासून आपल्या देशात वापरात आहे. या गव्हामध्ये तंतुमय घटक म्हणजेच फायबर भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे पचनक्रिया सुधारते, पोट जास्त वेळ भरलेले राहते आणि वारंवार भूक लागत नाही. खपली गव्हाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. म्हणजेच याची पोळी खाल्ल्यानंतर रक्तातील साखर हळूहळू वाढते. त्यामुळे मधुमेह असलेल्यांसाठी खपली गहू अधिक सुरक्षित मानला जातो.
advertisement
खपली गहूमध्ये लोह, मॅग्नेशियम, झिंक आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात. हे घटक हृदयाचे आरोग्य सुधारण्यास, कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यास आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. मात्र खपली गव्हाची पोळी साध्या गव्हाच्या तुलनेत थोडी जाड, करकरीत आणि पचायला वेळ घेणारी असते. त्यामुळे सुरुवातीला काही लोकांना ती जड वाटू शकते. पण नियमित सवय लागल्यानंतर पचनाच्या तक्रारी कमी झाल्याचे अनेक जण सांगतात.
advertisement
नेमका निष्कर्ष काय?
जर तुम्हाला पोटाचे विकार, मधुमेह, वजन नियंत्रण किंवा दीर्घकाळ आरोग्य टिकवायचे असेल, तर खपली गहू अधिक फायदेशीर ठरतो. मात्र मेहनतीचे काम करणारे, जास्त ऊर्जा लागणारे लोक किंवा ज्यांना कोणतीही पचनाची तक्रार नाही, त्यांच्यासाठी साधा गहू देखील योग्य आहे. शक्य असल्यास आठवड्यात काही दिवस खपली गहू आणि काही दिवस साधा गहू, असा समतोल ठेवणे आरोग्यासाठी अधिक चांगले ठरू शकते.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Feb 07, 2026 12:09 PM IST
मराठी बातम्या/हेल्थ/
Health Tips: साधा की खपली गहू, आरोग्यासाठी काय चांगलं? मधुमेह असणाऱ्यांनी काय खावं?








