Health Tips : हेल्दी आरोग्यासाठी हळदीचे दूध प्यावं की पाणी? काय सर्वात फायदेशीर? Video
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Mohan Najan
Last Updated:
आपण रोजच्या आयुष्यात आरोग्यासाठी अनेक घरगुती उपाय करत असतो. त्यामध्ये सर्वात जास्त वापरली जाणारी आणि विश्वासाने घेतली जाणारी गोष्ट म्हणजे हळद.
छत्रपती संभाजीनगर : आपण रोजच्या आयुष्यात आरोग्यासाठी अनेक घरगुती उपाय करत असतो. त्यामध्ये सर्वात जास्त वापरली जाणारी आणि विश्वासाने घेतली जाणारी गोष्ट म्हणजे हळद. आपल्या घराघरांत पिढ्यानपिढ्या हळदीचं दूध किंवा हळदीचं पाणी घेतलं जातं. मात्र आजही अनेकांच्या मनात प्रश्न असतो, की हळदीचं दूध नेमकं कधी आणि कोणी घ्यावं? तर हळदीचं पाणी कोणासाठी जास्त फायदेशीर ठरतं पाहुयात.
हळदीचं दूध घेतल्यावर शरीराला एकत्रितपणे अनेक पोषक घटक मिळतात. दुधामधून कॅल्शियम, प्रोटीन आणि व्हिटॅमिन डी मिळतं, जे हाडं मजबूत करण्यास आणि शरीराला ताकद देण्यास मदत करतं. त्यात मिसळलेली हळद शरीरातील सूज कमी करण्याचं काम करते. हळदीतील करक्युमिन हा घटक जंतुसंसर्गाशी लढण्यास मदत करतो, रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो आणि वेदना कमी करतो. त्यामुळेच सर्दी, खोकला, घसा दुखणं, अंगदुखी किंवा सांधेदुखी असल्यास हळदीचं दूध गुणकारी मानलं जातं. तसेच आजारपणातून बरे होत असताना शरीराला आवश्यक ऊर्जा देण्याचं कामही हळदीचं दूध करतं. रात्री झोपण्यापूर्वी हळदीचं दूध घेतल्याने झोप चांगली लागण्यास मदत होते, असंही तज्ज्ञ सांगतात.
advertisement
मात्र हळदीचं दूध सगळ्यांसाठीच योग्य असेल असं नाही. ज्यांना दूध पचत नाही, लॅक्टोज इन्टॉलरन्सचा त्रास आहे, पोट फुगणं किंवा ॲसिडिटीची समस्या आहे, अशा लोकांनी हळदीचं दूध टाळावं. तसेच वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत असलेल्या लोकांनी दररोज हळदीचं दूध घेणं योग्य ठरत नाही, कारण दूध हे कॅलरीयुक्त असतं. अशा परिस्थितीत हळदीचं दूध औषधासारखं, गरजेनुसारच घ्यावं, असा सल्ला दिला जातो.
advertisement
हळदीचं पाणी हे अधिक हलकं आणि रोजच्या वापरासाठी सोयीचं मानलं जातं. कोमट पाण्यात मिसळलेली हळद शरीराला वेगळ्या पद्धतीने फायदेशीर ठरते. हळदीच्या पाण्यामधून करक्युमिन, अँटीऑक्सिडंट्स आणि दाह कमी करणारे घटक मिळतात, जे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करतात. सकाळी उपाशीपोटी हळदीचं पाणी घेतल्यास पचनसंस्था सुधारते, मेटाबॉलिझम वेगाने काम करू लागतो आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. त्वचा स्वच्छ राहणं, पिंपल्स कमी होणं आणि शरीराला नैसर्गिक डिटॉक्स मिळणं, हेही हळदीच्या पाण्याचे फायदे मानले जातात. मधुमेह असलेल्या रुग्णांसाठीही हळदीचं पाणी उपयुक्त ठरू शकतं, कारण ते रक्तातील साखरेच्या पातळीवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतं.
advertisement
हळदीचं पाणी प्रामुख्याने अशा लोकांसाठी योग्य ठरतं, ज्यांना पचनाचा त्रास आहे, वजन कमी करायचं आहे, त्वचेची काळजी घ्यायची आहे किंवा रोजच्या दिनचर्येत हलका आणि नैसर्गिक उपाय हवा आहे. मात्र ज्यांना पित्ताचा त्रास जास्त आहे, पोटात जळजळ होते, पित्ताशयाचे आजार आहेत किंवा डॉक्टरांनी हळद टाळण्याचा सल्ला दिला आहे, अशा लोकांनी हळदीचं पाणीही मर्यादित प्रमाणातच घ्यावं.
advertisement
म्हणूनच हळदीचं दूध की हळदीचं पाणी, हा प्रश्न सरळसरळ नाही. दोन्हींचे फायदे वेगवेगळे असून ते शरीराच्या गरजांवर अवलंबून आहेत. सर्दी, खोकला, वेदना किंवा कमजोरी जाणवत असेल, तर हळदीचं दूध उपयुक्त ठरतं. तर पचन सुधारणा, वजन नियंत्रण आणि रोजच्या आरोग्यासाठी हळदीचं पाणी अधिक फायदेशीर ठरू शकतं.
Location :
Aurangabad [Aurangabad],Aurangabad,Maharashtra
First Published :
Feb 05, 2026 4:37 PM IST
मराठी बातम्या/हेल्थ/
Health Tips : हेल्दी आरोग्यासाठी हळदीचे दूध प्यावं की पाणी? काय सर्वात फायदेशीर? Video






