सिनियर असोसिएट एडिटर,
न्यूज18 लोकमत
पोलंडच्या दौऱ्यावर असताना पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केल्याने अनेकांच्या मनात कुतूहल निर्माण झालं. पोलंडचा आणि मराठीचा काय संबंध? पोलंडचं आणि महाराष्ट्राचं काय कनेक्शन? असे प्रश्न अनेकांना पडले. पण मोदींच्या पोलंड दौऱ्यात पोलंडवासियांनी कोल्हापूरप्रती प्रेम व्यक्त करण्याचं कारण काय?
दुसरं महायुद्ध आणि ज्यूंचा नरसंहार
advertisement
साल होतं 1943 चं. संपूर्ण जगावर ढग होते दुसऱ्या महायुद्धाचे. पोलंडमधल्या ज्यू नागरिकांचा हिटलरकडून अमानुष नरसंहार सुरु होता. आपला जीव वाचवण्यासाठी पोलंडचे नागरिक जिथे आसरा मिळेल तिथे धाव घेत होते. अशातच जगातल्या अनेक देशांनी पोलंड निर्वासितांसाठी आपल्या देशाची दारं बंद केली. पण याच वेळी भारत सरकारच्या मदतीने आपल्या देशातली दोन संस्थानं पोलंडवासियांच्या सुरक्षेसाठी पुढे सरसावली. त्यातलं एक होतं गुजरातचं नवानगर संस्थान आणि दुसरं आपल्या महाराष्ट्रातलं करवीर संस्थान.
कोल्हापूर, नवानगर पोलंडवासीयांचं नवं घर
जवळपास 500 निर्वासितांची सोय गुजरातच्या नवानगर संस्थानने केली. तर महाराष्ट्रात करवीर संस्थानने 5 हजार पोलंडवासियांना आश्रय दिला. या आश्रितांमध्ये मुख्यत्वे महिला, लहान मुलं आणि वृद्धांचा समावेश होता.
1943 ते 1948 अशी पाच वर्ष पोलंडच्या या निर्वासितांसाठी कोल्हापूर त्यांचं दुसरं घर बनलं होतं. कोल्हापूरचे राजे छत्रपती राजाराम महाराज कोल्हापूरपासून 10 किलोमीटरवर असलेल्या वळीवडे गावाच्या जंगलात शिकरीसाठी जायचे. निर्मनुष्य असलेला हा परिसर निर्वासितांच्या कॅम्पसाठी नक्की केला गेला. सरकारच्या वतीने हिंदुस्तान कंपनीला बांधकामाचं कंत्राट मिळालं. कॅनी नावाच्या युरोपियन इंजिनिअरच्या देखरेखीखाली दीड वर्षात या कॅम्पचं बांधकाम पूर्ण झालं.
पोलंडचे निर्वासित वळीवडेत
वळीवडेमध्ये निर्वासितांसाठी छोटंसं शहरच वसवलं गेलं. वळीवडे गावातल्या छावण्यांमध्ये बंगलावजा घरं उभारली गेली. 185 बरॅक्स उभारल्या गेल्या. प्रत्येक बरॅकमध्ये 12 ब्लॉक्स होते. घराच्या मागे आणि पुढे व्हरांडा, बैठकीची खोली, झोपण्याची खोली, स्वयंपाक घर अशी टुमदार घरं बांधली गेली. निर्वासितांच्या या वसाहतीत 5 सरकारी बंगले होते. भाजी मार्केट होतं, जन्म मृत्यू नोंदणीचं कार्यालय होतं. इथे निर्वासितांसाठी चर्च, कम्युनिटी सेंटर, शाळा, कॉलेज, सिनेमागृह, पोस्ट ऑफिसचीही उभारणी झाली. एकप्रकारे कोल्हापूरमध्ये मिनी पोलंड निर्माण केलं गेलं. 1948-49 साली दुसरं महायुद्ध संपताना पोलंडवासीय या छावणीतून आपल्या मायदेशी परतले. पण 7 दशकांनंतरही त्यांच्या मनातले वळीवडेसोबतचे बंध अतूट आहेत.
कोल्हापूरच्या राजघराण्याचं औदार्य
पोलंडवासियांना कोल्हापुरात सुरक्षित आश्रय मिळू शकला कोल्हापुरच्या राजघराण्याच्या औदार्यामुळे. करवीर संस्थानचे हे उपकार पोलंडवासिय आजही विरसलेले नाहीत. म्हणूनच पोलंडच्या वॉर्सा मध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या करवीर संस्थानप्रती कृतज्ञता म्हणून स्मारकाची उभारणी केली गेली आहे.
पोलंडचा निर्वासित कॅम्प असलेला परिसर आज गांधीनगर म्हणून ओळखला जातो. पोलंडवासियांच्या वळीवडेतल्या स्मृती जतन करण्यासाठी इथल्या छत्रपती युवराज शाहू महाराज शाळेच्या प्रांगणात स्मृतीस्तंभ उभारला गेलाय. ज्याच्या उद्घाटनासाठी पोलंडचे नागरिक आवर्जुन हजर होते. तर 2019 साली कोल्हापूरात आलेल्या महापूरात वळीवडेचं मोठं नुकसान झाल्याचं पाहून पोलंडवासियांनी मदतीचा हातही देऊ केला होता.
आज 7 दशकांनंतरही पोलंड आणि वळीवडेचे ऋणानुबंध कायम आहेत आणि त्याचीच पर्चित आपल्याला नरेंद्र मोदींच्या पोलंड दौऱ्यात आली.