मिळालेल्या माहितीनुसार, पप्पू यादव शुक्रवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास लोकसभेचे अधिवेशन संपवून दिल्लीहून पाटण्याला परतले होते. ते घरी पोहोचताच काही वेळात पाटणा पोलिसांनी त्यांच्या घराला वेढा घातला. या कारवाईत ५ पोलीस ठाण्यांचे पथक आणि मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात होता. सिटी एसपी भानु प्रताप सिंह आणि एसएसपी कार्तिकेय शर्मा स्वतः पप्पू यादव यांना अटक करण्यासाठी आले होते.
advertisement
जेव्हा साध्या वेशातील पोलीस अधिकारी त्यांच्या घरात शिरले, तेव्हा पप्पू यादव यांनी आक्रमक पवित्रा घेतला. "मला मारण्यासाठी हे लोक आले आहेत, हे पोलीस नसून गुंड असावेत, असा मला संशय आहे," असा दावा त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. बराच वेळ चाललेल्या या हायव्होल्टेज ड्राम्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
पप्पू यादव यांच्यावरील ही कारवाई ३१ वर्षांपूर्वीच्या (१९९५) एका जुन्या खटल्याशी संबंधित आहे. घरमालक विनोद बिहारी लाल यांनी ही तक्रार दाखल केली होती. पप्पू यादव यांनी वैयक्तिक वापरासाठी घर भाड्याने घेतले, परंतु तिथे राजकीय कार्यालय सुरू केले. जेव्हा घरमालकाने विरोध केला, तेव्हा त्यांना धमकावण्यात आले आणि फसवणूक करण्यात आली, असा आरोप पप्पू यादव यांच्यावर आहे.
हे प्रकरण सध्या खासदार-आमदार (MP-MLA) विशेष न्यायालयात सुरू आहे. वारंवार समन्स बजावूनही पप्पू यादव न्यायालयात हजर झाले नाहीत, त्यामुळे न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले होते. अटकेनंतर पप्पू यादव यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले, "मी नुकताच नीट (NEET) परीक्षेतील विद्यार्थ्यांचा मृत्यू आणि गर्ल्स हॉस्टेलमधील समस्यांबाबत सरकारला जाब विचारला होता. माझा आवाज दाबण्यासाठी हे राजकीय षडयंत्र रचले गेले आहे. पोलिसांनी मला अटकेचे वॉरंट न दाखवता केवळ मालमत्ता जप्तीची नोटीस दाखवली."
बिहारच्या राजकारणात खळबळ
पप्पू यादव यांच्या अटकेमुळे बिहारच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. ते सध्या पोलीस कोठडीत असून, आज (शनिवार) त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्यांना जामीन मिळणार की कोठडीत वाढ होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
