वाहतुकीच्या नियमांनुसार अशा वाहनांवर बंदीची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे बोगद्यामध्ये किंवा घाटात गॅस गळती किंवा स्फोट होऊन होणाऱ्या मोठ्या दुर्घटनांची भीती कायमची मिटणार आहे.
अडोशी बोगद्याजवळ गॅस टँकर उलटल्यानंतर ३२ तास वाहतूक ठप्प होती. जर 'मिसिंग लिंक' सुरू असती, तर प्रवाशांना तात्काळ पर्यायी मार्ग उपलब्ध झाला असता. मिसिंग लिंकमुळे वेळेची बचत होऊन प्रवासाचा वेळ ३० मिनिटांनी कमी होईल.बोरघाटातील अवघड वळणे आणि चढ-उतार टाळता येतील. याशिवाय प्रवासाचे अंतर ६ किमीने कमी होणार आहे. ज्यामुळे पैसे आणि वेळ दोन्ही वाचेल.
advertisement
सुमारे ६,६९५ कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प आता अंतिम टप्प्यात असून राज्य सरकारने एमएसआरडीसीला (MSRDC) काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. खोपोली ते कुसगाव या १९ किमीच्या टप्प्यात आशियातील सर्वात रुंद बोगदे आणि उंच पूल बांधण्यात आले आहेत. येत्या काही महिन्यांत ही मार्गिका खुली झाल्यावर प्रवाशांना सुरक्षित प्रवासाचा अनुभव घेता येईल.
