नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी बिपीन नंदलाल चौधरी (वय 28, रा. मोशी) हे रविवारी (8 फेब्रुवारी) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास संतनगर चौक ते जय गणेश साम्राज्य चौक या दरम्यान पायी चालले होते. यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन भामट्यांनी त्यांना रस्त्यात अडवले. काही समजण्याच्या आतच आरोपींनी त्यांना धमकावत त्यांच्या खिशातील ८ हजार रुपयांची रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून घेतली आणि घटनास्थळावरून पळ काढला.
advertisement
पुण्याच्या ताडीवाला रोडचा आरोपी जेरबंद
लूटमार झाल्यानंतर बिपीन चौधरी यांनी तत्काळ एमआयडीसी भोसरी पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून तपास सुरू केला आणि यातील एका आरोपीचा शोध लावला. मनोज काळुराम गायकवाड (वय ३४, रा. ताडीवाला रोड, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या गुन्ह्यात त्याला साथ देणाऱ्या दुसऱ्या आरोपीचा शोध सध्या पोलीस घेत आहेत.
वर्दळीच्या रस्त्यावर अशा प्रकारे पादचाऱ्यांना लुटले जात असल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. पोलीस आता अटक केलेल्या आरोपीकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येतात का, याचा तपास करत आहेत.
