शौचास गेला अन् परतलाच नाही...
चाळीसगाव येथील ऊसतोड मजूर किरण सोनवणे हे आपल्या कुटुंबासह केंजळ येथील ऊस फडात कामासाठी आले आहेत. ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ च्या सुमारास त्यांचा मुलगा कृष्णा (वय ५) याला शौचास लागल्याने आईने त्याला शेताच्या कडेला पाठवले. बराच वेळ झाला तरी मुलगा परतला नाही, म्हणून आईने शोध घेतला असता उसाच्या शेतात कृष्णा रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला आढळला. त्याच्या मानेवर आणि अंगावर गंभीर जखमा होत्या. त्याला तातडीने भोर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
advertisement
बिबट्या की कुत्रा? वनविभागाचा मोठा खुलासा
सुरुवातीला हा हल्ला बिबट्याचा असावा, अशी दाट शक्यता वर्तवली जात होती, ज्यामुळे मजुरांमध्ये प्रचंड घबराट पसरली होती. मात्र, नसरापूर वनपरिक्षेत्र अधिकारी वसंत चव्हाण यांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर हा संभ्रम दूर केला. "कृष्णाच्या अंगावरील जखमा वन्यप्राण्याच्या नसून कुत्र्याच्या आहेत. घटनास्थळी कुत्र्याच्या पायाचे ठसे आढळले असून, प्रत्यक्षदर्शी कामगारांनीही कुत्र्याला हल्ला करताना पाहिले आहे," असे त्यांनी स्पष्ट केले.
मजुरांच्या मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
या घटनेमुळे केंजळ परिसरात शोककळा पसरली असून ऊसतोड मजुरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ऊस फडांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात भटक्या कुत्र्यांचा वावर असतो, जे मजुरांच्या लहान मुलांसाठी जीवघेणे ठरत आहेत. प्रशासनाने यावर तात्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे. राजगड पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
