असे मानले जाते की, संत तुकाराम महाराज वैकुंठगमनाच्या आधी या गावात थांबले होते. तेव्हा आपल्या प्रिय भक्ताच्या आग्रहास्तव त्यांनी स्वतःचे दगडी टाळ या गावात प्रसाद म्हणून दिले. हीच टाळ आजही या गावात पूजली जाते आणि गावाचे नावही टाळगाव असे पडले.
advertisement
या मंदिराच्या संदर्भात एक ऐतिहासिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, संत तुकाराम महाराजांचे निष्ठावंत 14 टाळकरी होते. त्यातील मल्हारराव पंत हे एक होते. त्यांना तुकाराम महाराजांनी प्रसादस्वरूप टाळ देऊन त्यांच्या हाती 12 अभंगांचा ग्रंथ सुपूर्द केला होता. तुकाराम महाराजांनी इंद्रायणी नदीच्या तीरावर अनुष्ठान करायला जाताना या टाळ दिले होते.
फाल्गुन महिन्यातील वद्य पंचमी या तिथीला तुकाराम महाराजांनी हे टाळ दिल्याची आख्यायिका आहे. त्या निमित्ताने दरवर्षी भजन-कीर्तन, अभंग गायन, अन्नदान यांसारखे सोहळे आयोजित केले जातात.
मल्हारपंत कुलकर्णी यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या स्मरणार्थ समाधी बांधण्यात आली आहे. मंदिराचे पुजारी तुळशीदास जवणे यांनी सांगितलं की, ही परंपरा गेली साडेतीनशे वर्षांपासून अखंडपणे सुरू आहे आणि टाळगावची ओळखही ह्या टाळांच्या पूजेमुळेच महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाली आहे. हे मंदिर म्हणजे केवळ श्रद्धेचेच नव्हे तर संत परंपरेच्या इतिहासाचेही एक जतन आहे.