नवसाला पावणारी देवी
जालना शहरातील जे इ एस महाविद्यालयात भरणारी दुर्गादेवीची यात्रा अतिशय प्रसिद्ध आहे. भक्तांच्या नवसाला पावणारी देवी म्हणून दुर्गादेवीची सर्व दूर ख्याती आहे. देवीला नवस बोलल्यानंतर तो हमखास पूर्ण होतो अशी भक्तांची मान्यता आहे. नवस पूर्ण झाल्यानंतर भक्त देवीची खणा नारळाने ओटी भरतात. नवरात्र उत्सवातील नऊ दिवस इथे भक्तांची मोठी गर्दी असते.
advertisement
गुरं चारायला आलेली कन्या गायब अन् रक्ताची धार, विदर्भातील देवीची अनोखी आख्यायिका
मंदिराविषयी आख्यायिका
दुर्गा देवीचे हे मंदिर जवळपास दीडशे वर्षे जुने आहे. दुर्गा देवीचे हे अतिशय पौराणिक मंदिर आहे. या देवीच्या मंदिराविषयी अशी आख्यायिका प्रचलित आहे की, शहरातील एक भक्त नानू रामजी श्रीमाळी यांच्या स्वप्नामध्ये दुर्गादेवी आली आणि मी इथे असून माझा जीव घुटमळत आहे, असं सांगितलं. त्यानंतर त्या भक्ताने देवीने सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी खोदकाम केले. तेव्हा त्यांना देवीची मूर्ती आढळली. त्याच ठिकाणी त्यांनी मूर्तीची विधीवत प्राणप्रतिष्ठा केली, असं मंदिराचे पुजारी अंबाशंकर श्रीमाळी यांनी सांगितलं.
परळी वैद्यनाथाशी विवाह करण्यासाठी कोकणातून आली देवी, पण अंबाजोगाईत... Video
नवरात्रीत मोठा उत्सव
इथे देवीची प्रतिष्ठापना झाल्यानंतर अश्विन महिन्यांमध्ये नऊ दिवस मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने यात्रा उत्सव साजरा केला जातो. घटस्थापनेच्या दिवशी देवीचा अभिषेक आणि शृंगार होतो. नऊ दिवस देवीचे वेगवेगळे शृंगार होतात. सकाळ, दुपार, संध्याकाळ आरती होते. देवीच्या दर्शनासाठी आलेल्या सर्व भक्त मंडळींच्या इच्छा आणि आकांक्षा देवीच्या आशीर्वादाने पूर्ण होतात. इच्छा आकांक्षा पूर्ण झाल्यानंतर भक्त देवीसाठी साडी, चोळी, ओटी, खण नारळ आदी साहित्य आणून देवीला अर्पण करतात. नऊ दिवस इथे आलेल्या भक्तांच्या सोयीसाठी यात्रेमध्ये वेगवेगळ्या वस्तू, खाद्यपदार्थ, मनोरंजनाचे साहित्य उपलब्ध झालेले असते. नवरात्र उत्सवातील नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी सुरू असतात, असं मंदिराचे पुजारी अंबाशंकर श्रीमाळी यांनी सांगितलं.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)